‘सुरुवात चांगली तर अर्धी मोहीम फत्ते’ ही उक्ती वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या निमित्ताने सिद्ध करण्यासाठी जगभरातले टेनिसपटू मेलबर्न नगरीत दाखल झाले आहेत. ग्रँड स्लॅम जेतेपद म्हणजे टेनिसविश्वाचा मानबिंदू. टेनिसचा अथक ध्यास जपणाऱ्या, अफाट तंदुरुस्ती सिद्ध करणाऱ्या टेनिसपटूंनाच ग्रँड स्लॅम जेतेपदाचा झळाळता चषक उंचावता येतो. मेलबर्नमध्ये हार्ड कोर्टवर रंगणाऱ्या आणि टेनिसचाहत्यांसाठी पर्वणी असणाऱ्या या टेनिस उत्सवात स्वप्नपूर्तीपेक्षा स्वप्नभंगाचे दु:ख बाळगणाऱ्यांची संख्या जास्त. हाताच्या बोटावर गणता येतील अशा स्वप्नपूर्तीमध्ये समावेश व्हावा यासाठी आठवडाभर धुमशान रंगणार आहे.

त्रिकुटाचे कवित्व ओसरणार?
रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या त्रिकुटाच्या वर्चस्वाला गेल्या वर्षी पहिल्यांदाच धक्का लागला. ढासळणारी कामगिरी आणि पाठीचे दुखणे यामुळे रॉजर फेडरर या नावाला साजेसा जादूई खेळ लोप पावत चालला आहे. ‘लाल मातीचा राजा’ राफेल नदाल दुखापतींच्या फेऱ्यात अडकला आहे. त्याच k07वेळी मातीवर प्रतिस्पध्र्याना नामोहरम करणारा नदाल हार्ड तसेच ग्रास कोर्टवर मात्र अजिंक्य नाही, याची जाणीव अधोरेखित झाली आहे. शैली आणि तंदुरुस्तीत या दोघांच्या तुलनेत नोव्हाक जोकोव्हिच किंचित मागे आहे. मात्र सातत्य आणि चिवट झुंज देण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी. गेल्यावर्षी जोकोव्हिचच्या खेळातले हेच सातत्य हरपल्याचे जाणवले.
वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीतून फेडररने पाठीच्या दुखण्यामुळे माघार घेतली. कारकीर्दीत सामन्यातून माघार घेण्याच्या दुर्मीळ घटनांमध्ये या सामन्याची नोंद झाली. यानंतर आठच दिवसांत पाठीचे दुखणे घेऊनच फेडररने डेव्हिस चषकात स्वित्र्झलडला पहिलेवहिले जेतेपद मिळवून दिले. महेश भूपती निर्मित इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग स्पर्धेत फेडरर सहभागी झाला होता. ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावून फेडररला दोन वर्षे लोटली आहेत. नुकताच त्याने कारकीर्दीतला विक्रमी हजारावा विजय नोंदवला. सार्वकालीन महान खेळाडूंच्या मांदियाळीतला फेडरर दुखापती, वाढते वय आणि नव्या खेळाडूंच्या ऊर्जेला प्रत्युत्तर देत ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवण्यासाठी आतुर आहे. लाल मातीव्यतिरिक्त ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर करून नदालला जवळपास दीड वर्ष झाले आहे. नुकत्याच कतार स्पर्धेत नदालला सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला. मॅरेथॉन मुकाबल्यातही अफाट ऊर्जेने खेळणाऱ्या नदालला हार्ड कोर्टवर जेतेपदाची वाट खडतर आहे. गेल्या वर्षी विम्बल्डन जेतेपदानंतर जोकोव्हिच मंदावला आहे. बोरिस बेकरसारख्या दिग्गजाच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या जोकोव्हिचला नव्या हंगामात मरगळ झटकून जेतेपदासाठी सज्ज होण्याची संधी आहे.

खांदेपालटाची संधी?
गेली अनेक वर्षे दुसऱ्या फळीत रेंगाळलेल्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्का आणि मारिन चिलीच यांनी त्रिकुटाच्या वर्चस्वातील त्रुटी हेरल्या आणि ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. वॉवरिन्काने चेन्नई खुली स्पर्धा जिंकत नव्या हंगामासाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे, मात्र त्याची खरी कसोटी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतच आहे. आपण केवळ एका स्पर्धेपुरता चमत्कार दाखवलेला नाही, हे पटवून देण्याची जबाबदारी वॉवरिन्कावर आहे. गेल्या वर्षी अद्भुत सातत्यासह खेळणारा मारिन चिलीच या स्पर्धेत खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणे ऐतिहासिक यश आहे, मात्र या यशात सातत्य राखणे किती कठीण आहे, याचा प्रत्यय वॉवरिन्का, चिलीच यांना स्पर्धेआधीच आला आहे. वॉवरिन्काच्या बरोबरीने इंग्लंडचा अँडी मरे, जपानचा केई निशिकोरी, स्पेनचा डेव्हिड फेरर यांना जेतेपदासह ठसा उमटवण्याची उत्तम संधी आहे.

सेरेना हरेना..
महिला टेनिसमध्ये दर्जापेक्षा आकर्षक वस्त्रे, विविधरंगी स्पोर्ट्स फॅशन दर्शवणारी आभूषणे यांचेच प्रदर्शन k04असते. सेरेना विल्यम्सने लौकिकाला साजेसा खेळ केल्यास अन्य खेळाडूंना जेतेपद दिवास्वप्नच ठरेल. गतविजेती लि नाने निवृत्ती घेतली आहे. मारिया शारापोव्हा, पेट्रा क्विटोव्हा, सिमोना हालेप, अ‍ॅना इव्हानोव्हिक, अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का यांनी प्रदर्शनात प्रचंड सातत्य आणले तरच ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न साकारू शकते. तूर्तास तरी सातत्यपूर्ण सेरेना विरुद्ध अन्य बेभरवशी मंडळी असा मुकाबला आहे.

फिर वहीं लोग..
सालाबादप्रमाणे ग्रँड स्लॅम मेळ्यात नेहमीच्या त्रिकुटावर भारताची भिस्त आहे. गेल्या वर्षी झंझावाती k03फॉर्ममध्ये असणारी सानिया मिर्झा नव्या हंगामात तैपेईच्या साथीदारासह खेळणार आहे. अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्सच्या साथीने खेळताना सानियाने अपिआ स्पर्धेचे जेतेपद पटकावत नव्या हंगामासाठी तय्यार असल्याचे दाखवून दिले आहे. कौटुंबिक कलहामुळे सूर हरपलेला अनुभवी लिएण्डर पेस कारकीर्दीतील विक्रमी २५व्या हंगामात दमदार पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे. रोहन बोपण्णा डॅनियल नेस्टरच्या साथीने नशीब अजमावणार आहे. इतक्या वर्षांनंतरही ग्रँड स्लॅम विश्वात भारताची धुरा हेच तिघे वाहत आहेत. आंतरराष्ट्रीय पल्ला गाठणे आणि तिथे स्थिरावणे किती कठीण आहे, याचा प्रत्यय सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांच्या पात्रता फेरीतील पराभवाने आला आहे. एकेरीत युकी भांब्री हे भारताचे एकमेव आशास्थान आहे.

उष्णता धोरण
गेल्या वर्षी स्पर्धेदरम्यान पाऱ्याने चाळिशीचा आकडा ओलांडला होता. त्या वातावरणातही सामने खेळावे लागल्याने सर्वच खेळाडूंनी संयोजकांवर जोरदार टीका केली होती. आरोग्याला हानीकारक अशा वातावरणात खेळणे अशक्य असल्याचे खेळाडूंनी सांगितले होते. हे लक्षात घेऊन संयोजकांनी विशेष उष्णता धोरण अवलंबले आहे. पाऱ्याने चाळिशीचा टप्पा ओलांडल्यास तत्क्षणी सामना थांबवण्यात येणार आहे, मात्र असे अनेक सामने अर्धवट राहिल्यास वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

बक्षीस रकमेत वाढ
ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये पाच वर्षांत नीचांकी घट झाल्याने स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. ४० दशलक्ष डॉलर्स एवढी एकूण बक्षीस रक्कम असून, एकेरीच्या विजेत्याला ३.१ दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम मिळणार आहे. बक्षीस रक्कम वाढावी यासाठी गेल्या वर्षी खेळाडूंनी स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता, म्हणून बक्षीस रक्कम ३३ दशलक्ष डॉलर्सवर नेण्यात आली होती. यावर्षी बक्षीस रकमेत पुन्हा वाढ करत संयोजकांनी खेळाडूंना खूश केले आहे.

आशियाई झेंडा
स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आशियाई खेळाडूंचे प्रमाण ७५ टक्क्य़ांनी लक्षणीय वाढले आहे. गेल्या वर्षीच्या २३च्या तुलनेत यंदा आशियाई उपखंडातील ४० खेळाडू विविध प्रकारांत या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.