मेलबर्न : इटलीच्या सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सी जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. अव्वल मानांकित आणि गतविजेत्या इराणी-व्हिन्सी जोडीने रशियाच्या पाचव्या मानांकित इकाटेरिना माकारोव्हा आणि एलेना वेसनिना जोडीवर ४-६, ६-३, ७-५ असा विजय मिळवला. तिसऱ्या सेटमध्ये माकारोव्हा-वेसनिना जोडीला मॅचपॉइंट मिळाला होता, मात्र ही संधी त्यांनी वाया घालवली आणि इराणी-व्हिन्सी जोडीने जेतेपदाची कमाई केली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची इराणी-व्हिन्सी जोडीची सलग तिसरी वेळ होती. हे या जोडीचे चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या जोडीने २०१२मध्ये फ्रेंच आणि अमेरिकन खुली स्पर्धा तर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.