scorecardresearch

कारकीर्दीतील या टप्प्यावर जेतेपदाचे महत्त्व अधिक -नदाल

‘कारकीर्दीतील या टप्प्यावर ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आली हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे.

मेलबर्न : विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदामुळे तू टेनिसमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे का? ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदानंतर स्पेनचा तारांकित टेनिसपटू राफेल नदालला हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देण्यापेक्षा कारकीर्दीतील या टप्प्यावर ग्रँडस्लॅम जेतेपदाला अधिक महत्त्व असल्याचे ३५ वर्षीय नदालने सांगितले.

‘‘कारकीर्दीतील या टप्प्यावर ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आली हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे. माझ्या दृष्टीने या जेतेपदाला अधिक महत्त्व आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी एकमेव योग्य दावेदार होतो, असे कधीही म्हणणार नाही. प्रत्येक स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक दावेदार असतात आणि ते जेतेपदाचे ध्येय साधण्यासाठी सारखीच मेहनत घेतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांत टेनिस कोर्टावर परतण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागले. मी कायम सकारात्मक विचार केला,’’ असे नदाल म्हणाला.

‘‘मी टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे की नाही, याबाबतच्या चर्चानी मला काहीही फरक पडत नाही. मी सर्वोच्च स्तरावर केवळ खेळाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,’’ असेही नदालने नमूद केले. नदालने रविवारी अंतिम फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला नमवले.

फेडरर, जोकोव्हिच यांच्याकडून कौतुक

मेलबर्न : रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी नदालचे विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाबद्दल अभिनंदन केले. ‘‘माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी नदालचे २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरल्याबद्दल अभिनंदन. काही महिन्यांपूर्वी आपल्या दोघांनाही चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागत होता. तुझी मेहनत, जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती माझ्यासह जगभरातील अनेकांसाठी प्रेरणा आहे,’’ असे फेडररने लिहिले. तसेच नदालचे कौतुक करताना जोकोव्हिच म्हणाला, ‘‘नदाल तुझ्यातील हार न मानण्याच्या वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.’’

बार्टी, जोकोव्हिचचे अग्रस्थान कायम

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेत्या अ‍ॅश्ले बार्टीने जागतिक क्रमवारीतील महिला एकेरीचे अग्रस्थान कायम राखले आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचा ६-३, ७-६ (२) असा पराभव करत कारकिर्दीतील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. पुरुषांमध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेला मुकलेला नोव्हाक जोकोव्हिच अव्वल स्थानी कायम आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळलेले मेदवेदेव दुसऱ्या, तर नदाल पाचव्या स्थानी आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian open win one of the most emotional matches of my career rafal nadal zws

ताज्या बातम्या