ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी; मुनीचे नाबाद शतक

अखेरच्या काही षटकांत गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतीय महिला संघाने गमावला. सलामीवीर बेथ मुनीच्या (नाबाद १२५) शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून सलग २६व्या  विजयाची नोंद करताना तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

भारताने दिलेले २७५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर गाठले. एलिसा हिली (०), कर्णधार मेग लॅनिंग (६), एलिस पेरी (२) आणि अ‍ॅश गार्डनर (१२) या प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाची ४ बाद ५२ अशी अवस्था होती. मात्र, मुनीने ताहलिया मॅकग्रासोबत पाचव्या गडय़ासाठी १२६ धावांची भागीदारी रचली. मॅकग्राला ७४ धावांवर बाद करत दीप्ती शर्माने ही जोडी फोडली. मुनीने मात्र ११७ चेंडूंत शतक नोंदवले. तिला निकोला कॅरीची (नाबाद ३९) उत्तम साथ लाभली. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असताना अनुभवी झुलन गोस्वामीने दोन नो-बॉल टाकले. क्षेत्ररक्षणातही भारताने अतिरिक्त धावा दिल्याने ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर भारताने ५० षटकांत ७ बाद २७४ अशी धावसंख्या उभारली. स्मृती मानधना (८६) आणि शफाली वर्मा (२२) या सलामीच्या जोडीने आक्रमक शैलीत फलंदाजी केली. या दोघींनी ११ षटकांत ७४ धावांची सलामी दिल्यावर शफालीला सोफी मॉलिन्यूने बाद केले. कर्णधार मिताली राज (८) आणि यस्तिका भाटिया (३) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकल्या नाहीत. मात्र, रिचा घोष (४४), पूजा वस्त्रकार (२९) आणि झुलन (नाबाद २८) यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ७ बाद २७४ (स्मृती मानधना ८६, रिचा घोष ४४; ताहलिया मॅकग्रा ३/४५) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ५ बाद २७५ (बेथ मुनी नाबाद १२५, ताहलिया मॅकग्रा ७४, निकोला कॅरी नाबाद ३९; मेघना सिंह १/३८)

’  सामनावीर : बेथ मुनी.

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका