Duleep Trophy, North Zone vs East Zone: बंगळुरूत सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीतील क्वार्टर फायनलच्या सामन्यात फलंदाजी करताना आयुष बदोनीच्या दमदार फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. ईस्ट झोनविरूद्ध फलंदाजी करताना त्याने दमदार द्विशतकी खेळी केली आहे. या स्पर्धेतील पहिल्या क्वार्टर फायनलचा सामना नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला.पण पहिल्या डावात घेतलेल्या भक्कम आघाडीच्या बळावर नॉर्थ झोनने या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. नॉर्थ झोनकडून फलंदाजी करताना आयुष बदोनी द्विशतकं झळकावलं, तर यश धुल आणि अंकित कुमारने शतक पूर्ण केलं.

नॉर्थ झोनने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ४ गडी बाद ६५८ धावा केल्या आणि ८३३ धावांची भक्कम आघाडी घेऊन डाव घोषित केला. इतक्या मोठ्या धावांचा डोंगर उभारण्यात आयुष बदोनीने अतिशय मोलाची भूमिका बजावली. त्याने २२३ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने १३ चौकार आणि ३ षटकार खेचत २०४ धावांची खेळी केली. त्याने आपलं द्विशतक पूर्ण करताच नॉर्थ झोनच्या कर्णधाराने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या दिवशी सामन्याचा निकाल लागणं शक्य नव्हतं. त्यामुळे हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. आयुष बदोनीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने द्विशतक झळकावलं आहे.

यासह नॉर्थ झोन संघाने दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.या फेरीत नॉर्थ झोन संघाचा सामना साऊथ झोनविरूद्ध होणार आहे. हा सामना देखील बंगळुरूत खेळवला जाणार आहे. या सामन्यात नॉर्थ झोनच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. नॉर्थ झोनकडून फलंदाजी करताना कर्णधार अंकित कुमारने ३२१ चेंडूंचा सामना करत १९८ धावांची खेळी केली. तर यश धुलने १५७ चेंडूंचा सामना करत १३३ धावा चोपून काढल्या.

नॉर्थ झोनच्या फलंदाजांनी ईस्ट झोनच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ईस्ट झोनकडून गोलंदाजी करताना सुरज सिंद्धू जैस्वाल, रियान पराग, मुख्तार हुसैन आणि उत्तर्ष सिंग यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना एकही गडी बाद करता आलेला नाही. त्याने ११ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ३६ धावा खर्च केल्या. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने २३ षटकात १०० धावा खर्च करून १ गडी बाद केला.