Ayush Mhatre Record: आयुष म्हात्रे सध्या तुफान चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याच्याकडे भारतीय १९ वर्षांखालील संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. यासह फलंदाजीतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला. आयपीएल २०२५ स्पर्धेत त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने दमदार फलंदाजी केली. आता इंग्लंडविरूद्धच्या युथ कसोटी मालिकेतही त्याने दमदार कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याची बॅट शांत राहिली. पण कसोटी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये त्याने ८५ च्या सरासरीने आणि १०३.६६ च्या स्ट्राईक रेटने ३४० धावा चोपल्या आहेत. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
आयुष म्हात्रेने मोडला ब्रँडन मॅक्युलमचा मोठा विक्रम
आयुष म्हात्रे हा युथ कसोटी मालिकेत फलंदाजी करताना १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ३०० पेक्षा अधिक धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यासह त्याने न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रँडन मॅक्युलमचा मोठा विक्रम मोडून काढला आहे. याआधी २००१ मध्ये फलंदाजी करताना ब्रँडन मॅक्युलमनने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या युथ कसोटी मालिकेत ९५.५८ च्या स्ट्राईक रेटने ४५५ धावा केल्या होत्या. आता भारतीय कर्णधार या विक्रमाच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. यासह १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
हे आहेत युथ कसोटी मालिकेत सर्वात जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारे फलंदाज
आयुष म्हात्रे – २ सामने ३४० धावा, १०३.६५ स्ट्राईक रेट
ब्रँडन मॅक्युलम- ३ सामने ४५५ धावा, ९५.५८ स्ट्राईक रेट
एचटी डिक्सन- २ सामने ४०६ धावा, ८८.४५ स्ट्राईक रेट
जॉर्डन जॉनसन- २ सामने ३५८ धावा, ८५.४४ स्ट्राईक रेट
गौतम गंभीर – ३ सामने ३३१ धावा, ८३.१६ स्ट्राईक रेट
भारत- इंग्लंड कसोटी सामना ड्रॉ
मालिकेतील दुसरा सामना ड्रॉ राहिला आहे. या सामन्यात इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाने भारतीय १९ वर्षांखालील संघासमोर विजयासाठी ३५५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून प्रमुख फलंदाज वैभव सूर्यवंशी गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला. भारताला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. पण कर्णधार आयुष म्हात्रे मैदानावर टिकून राहिला. त्याने ८० चेंडूंचा सामना करत १२६ धावांची खेळी केली. भारतीय संघ विजयापासून ६५ धावा दूर होता. इतक्यात पावसामुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे हा सामना ड्रॉ राहिला.