लाहोर : आशिया चषक स्पर्धेसाठी ट्वेन्टी-२० संघातून वगळण्यात आलेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी फलंदाजांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आणखी एक धक्का दिला आहे. ‘पीसीबी’च्या वार्षिक कराराच्या यादीत या दोघांची ‘ब’ श्रेणीत पदावनती करण्यात आली आहे.
‘पीसीबी’ला सर्वोच्च ‘अ’ श्रेणीत स्थान देण्यायोग्य एकही खेळाडू वाटला नाही. वार्षिक कराराच्या यादीत एकूण ३० खेळाडूंना स्थान देण्यात आले असून त्यांची ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. त्यांच्याशी किती रकमेचा करार करण्यात आला हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
‘आयसीसी’च्या स्पर्धांत निराशाजनक कामगिरी केल्याचा बाबर आणि रिझवान यांना फटका बसला आहे. गेल्या वर्षीची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा, तसेच या वर्षी मायदेशात झालेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा यात बाबर आणि रिझवानला अपयश आले. याचा विपरित परिणाम पाकिस्तान संघाच्या कामगिरीवरही झाला. त्यामुळेच एकदिवसीय संघाचा कर्णधार असूनही रिझवानला ‘अ’ श्रेणीतील स्थान राखता आले नाही.
याउलट ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आघाला ‘क’ श्रेणीतून ‘ब’मध्ये बढती मिळाली. यंदा १२ नव्या खेळाडूंना वार्षिक कराराच्या यादीत स्थान मिळाले, तर गेल्या वर्षीच्या यादीतून आठ जणांना वगळण्यात आले. ‘ब’ श्रेणीत बाबर, रिझवान, आघा यांच्यासह अबरार अहमद, फखर झमान, हारिस रौफ, हसन अली, सैम अयुब, शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे.