खेळाडूंचा विरोध न जुमानता जागतिक बॅडमिंटन महासंघ ऑगस्टपासून पाच गेम्सच्या सामन्यांच्या नियमावलीची प्रायोगिक पद्धतीने अंमलबजावणी करणार आहे. यातील प्रत्येक गेम हा ११ गुणांचा राहणार आहे. बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांच्या तीन गेम्सचे सामने आयोजित केले जातात. त्याऐवजी टेबल टेनिसप्रमाणे ११ गुणांच्या पाच गेम्सची पद्धत सुरू केली जाणार आहे. या प्रस्तावित बदलाला अनेक खेळाडूंनी विरोध दर्शवला आहे. नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महासंघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला होता. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे. त्याला खेळाडू, चाहते व अन्य संबंधित घटकांची काय प्रतिक्रिया येते, यावरच नियमावलीच्या कायमस्वरूपी अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाईल.