या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणा सरकारने परवानगी दिली तर भारतीय बॅडमिंटन संघटनेमार्फत (बीएआय) हैदराबाद येथे १ जुलैपासून सराव शिबिराचे आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र देशांतर्गत बॅडमिंटन स्पर्धेला सप्टेंबपर्यंत परवानगी नाकारण्यात आली आहे.

हैदराबाद येथे सरावाला परवानगी मिळाली तर पी. व्ही. सिंधू, सायना नेहवालसारख्या अव्वल बॅडमिंटनपटू सरावाला सुरुवात करू शकतील. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) बेंगळूरु येथे गेल्या महिन्यात सरावाला परवानगी दिल्याने तेथील बॅडमिंटनपटूंचा सराव सुरू झाला होता. मात्र हैदराबाद येथे करोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेलंगणा सरकारने ३० जूनपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती. ‘‘टाळेबंदीचा मोठा फटका खेळाडूंच्या सरावाला बसला. मात्र जर तेलंगणा सरकारने परवानगी दिली तर १ जुलैपासून हैदराबाद येथे सरावाला सुरुवात करू,’’ असे ‘बीएआय’चे सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले.

‘‘देशांतर्गत बॅडमिंटन स्पर्धाचा विचार करता विविध राज्यांच्या संघटनांशी चर्चा केली. मात्र सध्याची विविध राज्यांतील करोनाची स्थिती पाहता सप्टेंबपर्यंत देशांतर्गत बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन कठीण आहे. सप्टेंबरमध्ये करोनाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल,’’ असे सिंघानिया यांनी स्पष्ट केले.

‘बीएआय’ने मार्चमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा लांबणीवर टाकली होती. या स्पर्धेचे सप्टेंबपर्यंत आयोजन कठीण आहे. वरिष्ठ क्रमवारी स्पर्धेऐवजी १, २ आणि ३ अशा तीन पातळ्यांवरील स्पर्धेचा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये ‘बीएआय’कडून मांडण्यात आला होता. मात्र करोनामुळे सध्या त्याबाबत कोणतीच चर्चा नाही. भारतात करोनामुळे हैदराबाद खुली बॅडमिंटन स्पर्धा (ऑगस्ट) आणि पुण्यात होणारी इंडिया कनिष्ठ आंतरराष्ट्रीय ग्रां-प्री (ऑगस्ट) रद्द झाल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badminton practice starts from 1st july abn
First published on: 27-06-2020 at 00:09 IST