बॉल टॅम्परिंगच्या आरोपानंतर डेव्हिड वॉर्नर आणि संघाच्या अन्य सदस्यांमधील वाद टोकाला पोहोचला आहे. या आरोपानंतर डेव्हिड वॉर्नरने संघाचा व्हॉट्स अॅपवरील ग्रुप सोडला असून वॉर्नरला दुसऱ्या हॉटेलमध्ये रुम बुक करुन द्यावी, अशी मागणी संघातील काही खेळाडूंनी केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी कर्णधार स्टिव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन ब्रँक्रॉफ्ट हे गोत्यात आले. स्टिव्ह स्मिथला कर्णधार तर डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधारपद सोडावे लागले आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कारवाई केली असून क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या तिघांना तातडीने दक्षिण आफ्रिका सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकीकडे या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे संघातील वादही चव्हाट्यावर आले आहेत. बॉल टॅम्परिंगच्या आरोपानंतर डेव्हिड वॉर्नर आणि संघातील अन्य खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला. डेव्हिड वॉर्नरच बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा सूत्रधार असल्याची भावना काहींच्या मनात होती. तर डेव्हिड वॉर्नरही संघापासून चार हात लांबच होता. तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर वॉर्नर त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत बसला होता. यावरही संघातील खेळाडूंमध्ये नाराजी होती. वॉर्नरला दुसऱ्या हॉटेलमध्ये पाठवावे, अन्यथा आम्ही दुसरीकडे जाऊ असा इशाराच काही खेळाडूंनी दिला होता. सुदैवाने वॉनर्रला दक्षिण आफ्रिका सोडण्याचे आदेश दिल्याने अशी परिस्थिती ओढावली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघातील काही खेळाडूंच्या मते डेव्हिड वॉर्नरच या प्रकरणाचा सूत्रधार आहे. स्मिथ आणि ब्रँकॉफ्टपची या प्रकाराला संमती होती, असे काहींचे मत आहे. तर या संपूर्ण घटनेत एकाही गोलंदाजाचा समावेश नाही. बॉल टॅम्परिंगविषयी गोलंदाजालाच माहिती नाही, हे आश्चर्यकारक असल्याचे काही खेळाडूंचे मत आहे.ऑस्ट्रेलियातील काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बॉल टॅम्परिंगची माहिती डेव्हिड वॉर्नरनेच माध्यमांना दिल्याची शंका काही खेळाडूंना आहे.  आता या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा सहभाग होता, हे चौकशीतून स्पष्ट होईलच. पण या घटनेने ऑस्ट्रेलियन संघातही फूट पाडली हे नक्की.