भारतापाठोपाठ बांगलादेशातही वेस्ट इंडिजवर मानहानीकारक पराभवाची नामुष्की ओढवली. तिसऱ्या आणि अंतिम वनडेत बांगलादेशने २९६ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजचा डाव ११७ धावांतच आटोपला. बांगलादेशने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. बांगलादेशचा वनडे प्रकारातला (धावांच्या बाबतीत) हा दुसरा सर्वोत्तम विजय आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सौम्या सरकारने ९१ तर सैफ हसनने ८० धावांची खेळी केली. या दोघांनी १७६ धावांची खणखणीत सलामी दिली. मात्र या दोघांनंतर बांगलादेशच्या पुढच्या फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. नझमुल शंटोने ४४ धावा केल्या. वेस्ट इंडिजतर्फे अकेल हुसेनने ४ विकेट्स पटकावल्या.
वेस्ट इंडिजने या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सपशेल शरणागती पत्करली. १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अकेल हुसेनने केलेल्या २७ धावा वेस्ट इंडिजच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या होती. बांगलादेशतर्फे नसुम अहमद आणि रिषाद हुसेन यांनी प्रत्येकी ३ तर मेहदी हसन मिराझ आणि तन्वीर इस्लामने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ३०.१ षटकातच वेस्ट इंडिजचा डाव आटोपला.
पहिल्या वनडेत बांगलादेशने सरशी साधली होती. दुसरी लढत टाय झाली पण वेस्ट इंडिजने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात बांगलादेशने सर्वसमावेशक खेळाच्या बळावर सामना आणि मालिकाही जिंकली.
वेस्ट इंडिजने भारत दौऱ्यात अहमदाबाद कसोटी अवघ्या अडीच दिवसात गमावली होती. दिल्ली कसोटीत त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली पण दुसऱ्या डावात त्यांनी चांगला प्रतिकार केला आणि भारताला जिंकण्यासाठी चौथ्या डावात खेळायला उतरावं लागलं.