आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने माझ्यावर घातलेल्या एक वर्षांच्या बंदीचा उपयोग मला माझ्या शैलीत सुधारणा करण्यासाठी झाला आहे, असे भारताची महिला बॉक्सिंगपटू एल. सरिता देवीने सांगितले.
माजी जागतिक विजेती खेळाडू सरिताने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला होता. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या पार्क जिना हिच्याविरुद्ध तिला पराभव स्वीकारावा लागला होता. पंचांच्या पक्षपाती निर्णयामुळे आपला पराभव झाला असे जाहीरपणे सांगून तिने कांस्यपदक घेण्यास सुरुवातीला नकार दिला होता. त्यामुळे तिच्यावर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. या बंदीचा कालावधी गुरुवारी संपत आहे.
‘‘बंदीच्या कालावधीत मला खूप काही शिकायला मिळाले. मी आता संयमी झाले असून प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करत आहे. माझ्या कामगिरीत अजूनही सुधारणेला वाव आहे,’’ असे सरिताने सांगितले.
सरिता ही सध्या माजी आशियाई सुवर्णपदक विजेते दिंकोसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या सरावाबाबत सरिताने सांगितले की, ‘‘सध्या मी खूप मेहनत घेत आहे. आगामी जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवत ऑलिम्पिक पात्रता निश्चित करण्याचे माझे नजीकचे ध्येय आहे. जागतिक स्पर्धा माझ्यासाठी पुनरागमनाची संधी आहे. या स्पर्धेपूर्वी मी काही दिवस लिव्हरपूल येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.’’
ती पुढे म्हणाली की, ‘‘बंदीच्या कालावधीत माझ्या मनगटावर शस्त्रक्रिया करून घेतली तसेच शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी हा कालावधी मला उपयुक्त ठरला आहे. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वीच माझ्या मनगटास दुखापत झाली होती तरीही मी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी झाले होते. आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पक्षपाती निर्णयाविरुद्ध मी आवाज उठविल्यामुळे माझ्यावर कारवाई झाली, मात्र मला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय बॉक्सिंग संघटकांनी खूप आधार दिला त्यामुळेच मी पुन्हा बॉक्सिंगमध्ये उतरणार आहे.