Litton Das Record: बांगलादेशचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार पार पडल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला. या मालिकेत बांगलादेशच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मालिकेतील शेवटचा सामना कोलंबोत पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. यासह श्रीलंकेला ही मालिका २-१ ने गमवावी लागली आहे. बांगलादेशला ही मालिका जिंकून देणाऱ्या कर्णधार लिटन दासच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
लिटन दासच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद
टी-२० मालिकेआधी दोन्ही संघांमध्ये वनडे आणि कसोटी मालिका पार पडली. या दोन्ही मालिकांमध्ये बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. पण बांगलादेशने टी-२० मालिका जिंकून या दोन्ही मालिकेतील पराभवाचा बदला घेतला. ही मालिका जिंकताच कर्णधार लिटन दासच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. लिटन दास हा परदेशात बांगलादेशचं नेतृत्व करताना टी-२० मालिका जिंकणारा बांगलादेशचा पहिलाच कर्णधार
ठरला आहे. याआधी बांगलादेशच्या कुठल्याही कर्णधाराला परदेशात टी-२० संघाचं नेतृत्व करताना २ मालिका जिंकता आल्या नव्हत्या.
या सामन्यात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला २० षटकांअखेर ७ गडी बाद १३२ धावा करता आल्या. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना पथुम निसंकाने ३९ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली. यासह सनाकाने ३५ धावांची खेळी केली. या दोघांना वगळलं, तर इतर फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. संघातील ६ फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना मेहदी हसन मिराजने १६.३ धावा खर्च करत २ गडी बाद केले.
बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात १३३ धावा करायच्या होत्या. आव्हान फार मोठं नव्हतं. हे आव्हान बांगलादेशच्या फलंदाजांनी १६.३ षटकात पूर्ण केलं. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तंजिद हसनने ४३ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. या शानदार खेळीदरम्यान त्याने १ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार मारले. यासह कर्णधार लिटन दासने २६ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली. यासह बांगलादेशने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला आणि ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.