नवी दिल्ली : पाकिस्तानने अद्याप आशिया चषक हॉकी स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केलेला नाही. त्यांच्या माघारीचे वृत्त अजूनही बाहेरुनच आमच्यापर्यंत आले आहे. आम्ही अधिकृत माहितीच्या प्रतीक्षेत आहोत, ही आठवड्यापूर्वीची ‘हॉकी इंडिया’ची भूमिका कायम आहे. मात्र, पडद्यामागे पाकिस्तानच्या जागी बांगलादेशला समाविष्ट करुन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.
‘‘स्पर्धा ऐन तोंडावर आलेली असताना पाकिस्तानने अद्याप अधिकृतरित्या आपली भूमिका जाहीर केलेली नाही. भारताने स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यास मान्यता दिली आहे. यानंतरही सुरक्षेच्या कारणावरुन पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्याचे आमच्या कानावर येत आहे. आम्ही बांगलादेश हॉकी संघटनेची संपर्क साधला असून, येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल,’’ अशीच ‘हॉकी इंडिया’ची भूमिका कायम आहे.
आठवड्यापूर्वी आम्ही बांगलादेशशी संपर्क साधला नसल्याचे ‘हॉकी इंडिया’ने सांगितले होते. मात्र, आता त्यांनी संपर्क साधल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अर्थात, पाकिस्तानकडून नकाराची आणि बांगलादेशकडून सहभागी होण्याची पुष्टी झालेली नाही.
यंदा आशिया चषक स्पर्धा २९ ऑगस्टपासून राजगीर, बिहार येथे खेळवली जाणार आहे. स्पर्धेत भारतासह चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान, चायनीज तैपेइ हे देश सहभागी होणार असून, स्पर्धेतील विजेता संघ विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र होईल.