रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताचा सामना करण्यापूर्वी वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला सलामीच्या लढतीतच पराभवाचा सामना करावा लागला. भारतात येणार नसल्याने पाकिस्तानचा हा सामना कोलंबोत खेळवण्यात आला. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान पुरुषांचे संघ तीनवेळा आमनेसामने आले होते. दोन्ही संघांनी हस्तांदोलन केलं नाही. त्यावरून बराच वादंग झाला. भारतीय महिला संघानेही पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला एकदिवसीय विश्विचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान महिला संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. बांगलादेश महिला संघाने ३१ षटकांमध्ये पाकिस्तानवर ७ विकेट्सने सहज विजय मिळवला. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना १२९ धावांत सर्वबाद झाला.
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय बांगलादेशच्या बॉलर्सच्या पथ्यावर पडला. मारुफा अख्तेरने पहिल्याच ओव्हरमध्ये ओमायमा सोहेल आणि सिद्रा अमीनला तंबूत धाडलं. मुनीबा अली आणि रमीन शामीम यांनी डाव सावरला.नहिदा अख्तेरने मुनीबाला बाद केलं. तिने १७ धावा केल्या. अलिया रियाझ १३ धावा करुन तंबूत परतली. रमीन शामीमही नहिदा अख्तेरच्या बॉलिंगवर तंबूत परतली. तिने २३ धावा केल्या. कर्णधार फातिमा सानाने २२ धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही आणि त्यांचा डाव १२९ धावात ३८.३ ओव्हरमध्येच आटोपला. बांगलादेशतर्फे शोरना अख्तेरने ३.३ ओव्हरमध्ये ३ मेडनसह केवळ ५ धावांत ३ विकेट्स पटकावल्या. मारुफा अख्तेर आणि नहिदा अख्तेर यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
बांगलादेशने या लक्ष्याचा पाठलाग करताना फरगाना हकला झटपट गमावलं. शर्मिन अख्तेर १० धावा करुन बाद झाली. पण रुब्या हैदरने सूत्रधाराची भूमिका स्वीकारली. बांगलादेशसाठी वनडे पदार्पणात अर्धशतक झळकावणारी रुब्या ही केवळ तिसरी बॅटर ठरली. कर्णधार निगर सुलतानाने २३ धावांची खेळी केली. तर रूबया हैदर ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत नाबाद माघारी परतली.
वर्ल्डकप प्राथमिक फेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानचा पुढचा मुकाबला भारताशी होणार आहे. भारतीय संघाची पाकिस्तानविरुद्ध कामगिरी निर्भेळ विजयाचीच आहे. त्यानंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना करायचा आहे. प्राथमिक फेरीत अव्वल चार संघ सेमी फायनलमध्ये आगेकूच करतील. पाकिस्तानने आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही.