‘लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार (एमएसएन) या जगातील सर्वोत्तम आक्रमणपटूंच्या फळीला रोखणे अवघड आहे,’ यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्या लढतीपूर्वी केल्टिकचे प्रशिक्षक ब्रेंडन रॉजर्स यांना हे मत का मांडावे लागले याची प्रचिती बुधवारी आली. बार्सिलोनाच्या या त्रिमूर्तीने ‘क’ गटाच्या लढतीत केल्टिकच्या बचावफळीला निष्प्रभ करत ७-० असा दणदणीत विजय साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतआठवडय़ात कॅम्प नाऊ स्टेडियमवर झालेला मानहानीकारक पराभव बाजूला सारुन लुईस एन्रिकचा बार्सिलोना क्लब नव्या दमाने मैदानात उतरला. मेस्सीने हॅट्ट्रिकसह चार गोलसाठी सहकार्य केले. त्याला सुआरेझने दोन गोल, तर नेयमार व अ‍ॅड्रेस इनिएस्टा यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली. कॅम्प नाऊ स्टेडियमवर गोलधमाका उपस्थित जवळपास ७४ हजार प्रेक्षकांनी अनुभवला. ‘अनेक सामन्यांत आम्ही तिघांनी अशा विजयाचा आनंद एकत्र साजरा केला आहे आणि आज पुन्हा तो आनंद अनुभवला,’ अशी प्रतिक्रिया सुआरेझने व्यक्त केली.

सामान्याच्या तिसऱ्या मिनिटालाच मेस्सीने बार्सिलोनाचे खाते उघडले. त्यामध्ये २७व्या मिनिटाला भर घालून पहिल्या सत्रात बार्सिलोनाला २-० असे आघाडीवर ठेवले. २४व्या मिनिटाला केल्टिकला गोलफरक कमी करण्याची संधी होती. मौस्सा डेम्बेलेचा पेनल्टी स्पॉटवर गोल करण्याचा प्रयत्न बार्सिलोनाचा गोलरक्षक अ‍ॅण्ड्रे टेर स्टीगन याने अपयशी ठरवला.

दुसऱ्या सत्रात अवघ्या पाच मिनिटांत नेयमारने आणि ५९व्या मिनिटाला इनिएस्टाने गोल करून बार्सिलोनाची आघाडी ४-० अशी भक्कम केली. पुढील मिनिटाला मेस्सीने गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. अखेरच्या १५ मिनिटांत सुआरेझने (७५ व ८८ मि.) दोन गोल करून बार्सिलोनाला ७-० असा मोठा विजय मिळवून दिला.

बायर्न म्युनिचचा सहज विजय

जोशुआ किमिचच्या दोन गोलला रॉबर्ट लेवांदोवस्की, थॉमस म्युलर व जुआन बीमॅट यांच्या प्रत्येकी एक गोलच्या मिळालेल्या साथच्या जोरावर बायर्न म्युनिचने ‘ड’ गटाच्या पहिल्याच लढतीत रोस्टोव्हवर ५-० असा सहज विजय मिळवला. अ‍ॅटलेटिको माद्रिदने १-० अशा फरकाने पीएसव्हीचा पराभव केला. सॉल निग्युएझने ४३व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

‘अ’ गटात पॅरिस सेंट जर्मेन व आर्सेनल यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पहिल्याच मिनिटाला गोल करणाऱ्या पीएसजीच्या इडिंसन कव्हानीला ७७व्या मिनिटाला आर्सेनलच्या अ‍ॅलेक्सि सांचेझने सडेतोड उत्तर दिले. बॅसेन आणि लुडोजोरेट्स यांच्यातही १-१ अशी बरोबरी झाली. रेनाटो स्टीफनने निर्णायक गोल करून बॅसेलचा पराभव टाळला. लुडोजोरेट्सकडून जॉनथन कॅफूने (४५ मि.) गोल केला.

०६ : केल्टिक क्लबविरुद्ध तीन गोल करणाऱ्या लिओनेल मेस्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत सर्वाधिक ६ हॅट्ट्रिक नोंदवण्याचा विक्रम नावावर केला.

४७ : कॅम्प नाऊ स्टेडियमवर मेस्सीने ४७ गोल केले. त्याने एका स्टेडियमवर सर्वाधिक ४६ गोलचा रॉल यांचा विक्रम मोडला. रिअल माद्रिदच्या रॉल यांनी बेर्नाबेऊ स्टेडियमवर ही किमया केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona beat celtic in champions league
First published on: 15-09-2016 at 03:57 IST