माद्रिद : आघाडीच्या खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे गतविजेत्या बार्सिलोनाने ला लिगा फुटबाॅल सामन्यात मायोर्कावर ३-० असा विजय मिळवत हंगामाची दमदार सुरुवात केली.
सुरुवातीपासूनच बार्सिलोना संघाने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला लामिने यमालच्या क्रॉसवर राफिन्हाने गोल करीत संघाला आघाडीवर नेले. यानंतर सामन्याच्या २३व्या मिनिटाला बार्सिलोनाकडून फेरान टोरेसने गोल झळकावत संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलविरुद्ध मायोर्काने पंचांकडे तक्रार केली. कारण, त्यांच्या एका खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागून तो जमिनीवर पडला. पंचांनी मात्र, त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. यानंतर मायोर्काच्या दोन खेळाडूंना पहिल्याच सत्रात दोन लाल कार्ड मिळाली. त्याचा फटकाही संघाला बसला.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही बार्सिलोनाने आपली हीच लय कायम राखली. मात्र, मायोर्काच्या भक्कम बचावामुळे त्यांना गोल करण्यात अडथळे येत होते. अखेर दुसऱ्या सत्राच्या भरपाई वेळेत यमालने गोल करीत संघाची आघाडी ३-० अशी केली. अखेर तीच निर्णायक ठरली. गेल्या हंगामात १०२ गोल करीत जेतेपद मिळवणाऱ्या बार्सिलोनाचा अनुभवी आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्की या सामन्यात दुखापतीमुळे मैदानात उतरला नाही.
रायो व्हॅलेकानोचा विजय
पहिल्याच सत्रात झळकावलेल्या तीन गोलच्या जोरावर रायो व्हॅलेकानोने गिरोनावर ३-१ असा विजय मिळवला. व्हॅलेकानोकडून जोर्गे डी फ्रुटोस (१८व्या मिनिटाला), अलवारो गार्सिया रिवेरा (२०व्या मि.) आणि पालाझोन (४५व्या मि.) यांनी गोल करीत निर्णायक भूमिका पार पाडली. पराभूत संघाकडून एकमेव गोल जोएल रोकाने (५७व्या मि.) केला.