Barmi Armi on Virat Kohli: सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला १६ जूनपासून सुरुवात झाली. पहिल्याच कसोटीत बेन स्टोक्स याच्या नेतृत्वातील इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान, इंग्लंडच्या बर्मी आर्मीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावात मोईन अली जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. बर्मी आर्मी सामन्यादरम्यान अनेक वेळा असे काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे, ज्यामुळे अनेक प्रेक्षक त्याचा आनंद घेताना दिसतात. या व्हिडिओमध्ये मोईन अलीने भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एका चांगल्या चेंडूवर बाद केल्याचे पाहायला मिळते. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मोईन अली जेव्हा कसोटी फॉरमॅटमध्ये फॉर्मात येतो तेव्हा…’

बर्मी आर्मीचे हे ट्विट पाहून अनेक भारतीय चाहत्यांना राग अनावर झाला. सप्टेंबर २०२१ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर, मोईन अली या इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, जवळपास २वर्षानंतर, त्याने २०२३ च्या अ‍ॅशेस मालिकेतून पुनरागमनाची घोषणा केली आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडने आपला पहिला डाव ८ विकेट्स ३९३ धावांवर घोषित केला. जो रूटने संघासाठी चांगली फलंदाजी करत १५२ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११८ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने ७८ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. मोईन अलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने १७ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १८ धावांची खेळी केली.

हेही वाचा: ENG vs AUS: बेन स्टोक्सच्या ‘या’ निर्णयावर वॉन-पीटरसन संतापले; म्हणाले, “मी जर कर्णधार असतो तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ गडी गमावून ३११ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा २७९ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १२६* धावा करत खेळत आहे तर अ‍ॅलेक्स कॅरीने ८० चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५२* धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या डावात अजूनही ८२ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्याने आतापर्यंत २ बळी घेतले आहेत. खेळाचा तिसरा दिवस दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल.