भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या कर्णधारपदावरील वादवरून चांगलाच चर्चेत आहे. याशिवाय त्याने नुकत्याच गुडगावमधील एका मुलाखतीत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे देखील चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याच्या या प्रतिक्रियेवर युजर्सनकडून कमेंटचा पाऊस पडत आहे. या मुलाखतीत सौरव गांगुलीने पत्नी आणि गर्लफ्रेंड तणाव निर्माण करतात असं म्हटलं होतं.

या मुलाखतीत सौरव गांगुलीला आयुष्यात येणाऱ्या तणावाला कसं हाताळता याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सौरव गांगुलीने काहीसा उपहासात्मक उत्तर दिलं. सौरव गांगुली म्हणाला, “माझ्या आयुष्यात कोणताही तणाव नाही, पण हो हे खरं आहे की आयुष्यात बायको आणि प्रेयसी तणाव निर्माण करतात”.

यावेळी सौरव गांगुलीला कोणत्या खेळाडूची वृत्ती (attitude) सर्वात जास्त आवडते असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना सौरव गांगुलीने विराटचं नाव घेतलं. त्याने म्हटलं की, “मला विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो”.

सौरव गांगली आणि विराट कोहलीतील वाद काय?

भारतीय क्रिकेट संघातील कर्णधारपदावरुन सध्या चर्चा रंगली असून विराट कोहलीने केलेल्या गौप्यस्फोटामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत जाहीरपणे केलेल्या काही खुलाशांमुळे बीसीसीआयवर टीकेचा भडीमार होत आहे. विराट कोहलीने आपल्याशी टी-२० चं कर्णधारपद सोडू नये यासाठी कोणाचाही फोन आला नव्हता सांगत सौरव गांगुलीचा दावाही खोडून काढला आहे. यामुळे विराट विरुद्ध गांगुली असं चित्र उभं राहिलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आपण विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहोत असं म्हटलं आहे.

मात्र सौरव गांगुलीने त्याने विराट कोहली क्रिकेटमधील वेगवेगळ्या लोकांसोबत सतत भांडत असतो असं सांगत नाराजीदेखील जाहीर केली आहे. सौरव गांगुलीने आपण स्वत: विराट कोहलीला फोन करुन टी-२० चं कर्णधारपद सोडू नये यासाठी विनंती केली होती असं सांगितलं होतं. मात्र विराटने आपल्याशी कोणीही संपर्क साधला नव्हता सांगत अनेक प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.

गांगुलीने काय म्हटलं होतं?

कोहलीने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या विश्वचषकानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडून भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वपदही काढून मुंबईकर रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. विशेष म्हणजे या मुद्द्यावर, ‘विराटला टी-२० कर्णधारपद सोडण्याविषयी फेरविचार करण्याची विनंती केली होती. पण त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे आणि मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत म्हणून रोहितला कर्णधार केले’ असे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केले होते. त्याच्याशी पूर्ण विसंगत विराटचे बुधवारचे विधान ठरले.

हेही वाचा : Explained: विराट, रोहित, बीसीसीआय नी कर्णधारपद; काय आहे नेमका वाद?

विराट कोहलीने काय सांगितलं?

“‘टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नये यासाठी माझ्यासोबत कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. आफ्रिका दौऱ्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी ९० मिनिटे शिल्लक असतानाच मला कर्णधारपदावरून वगळण्यात आल्याचे समजले. ‘बीसीसीआय’ने एकदाही याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. कसोटी संघाबाबत संवाद झाल्यावर बैठक संपण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना निवड समितीच्या अध्यक्षांनी मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता,” असं विराटने सांगितलं आहे.