येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी टी २० विश्वचकाचे आयोजन करण्यात आले आहे. या विश्वचषकापूर्वीच भारतीय संघाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलाढ्य संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (3 ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारताच्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत हंगामाची सुरुवात सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी २० मालिकेने होईल. मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तर, नागपूर आणि हैदराबादमध्ये अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी २० सामना होणार आहे.

यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारताला तीन सामन्यांची टी २० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेची सुरुवात तिरुवनंतपुरममध्ये होणाऱ्या टी २० सामन्याने होणार आहे. या मालिकेतील दुसरा गुवाहाटी येथे खेळवला जाईल. तर, शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळवला जाईल.

टी २० मालिका संपल्यानंतर आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. तर, रांची आणि दिल्ली येथे अनुक्रमे दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना आयोजित केला आहे.

हेही वाचा – लवकरच सुरू होणार आणखी एक आयपीएल? माजी निवडकर्त्याने दिले संकेत

विश्वचषकापूर्वी विश्रांतीला ‘नो चान्स’

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी टी २० विश्वचषक सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला विश्रांतीची अजिबात संधी मिळणार नाही. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषक खेळवला जाणार आहे. १६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ग्रुप स्टेजचे सामने होणार आहेत. यानंतर २२ ऑक्टोबरपासून ‘सुपर १२’ लढती होतील.