मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याच्या परिस्थितीच्या नियमात एक बदल केला असून, तो २०२५-२६च्या हंगामापासूनच लागू करण्यात येईल. खेळाडूंच्या गंभीर दुखापती संदर्भातील नियम बदलण्यात आहे.

या बदलत्या नियमानुसार सामना सुरू असताना एखादा खेळाडू गंभीर जखमी झाला आणि तो खेळूच शकणार नसेल, तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला बदलण्याची मान्यता देण्यात आली आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कन्कशन नियमाशी साधर्म्य बाळगतो. अर्थात, हा नियम सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० किंवा विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी लागू करण्यात येणार नाही. हा नियम फक्त बहु-दिवसीय स्पर्धांसाठीच मर्यादित असेल. सी. के. नायडू करंडक स्पर्धेपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल.

सामन्यात खेळादरम्यान मैदानात एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली, तरच खेळाडू बदलता येईल, असे या नियमात स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे. अन्य कुठल्याही कारणाने खेळाडू बदल करता येणार नाही. या बदलाविषयी सर्व पंचांना अहमदाबाद येथे झालेल्या शिबिरात कल्पना देण्यात आली आहे. यामध्ये सामना निरीक्षकाचा अंतिम निर्णय असेल आणि त्याला आव्हान देता येणार नाही, असेही ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.

इंग्लंड दौऱ्यात भारताला ऋषभ पंत आणि इंग्लंडला ख्रिस वोक्सच्या दुखापतीमुळे दहा खेळाडूंसह खेळावे लागले होते. तेव्हा बदली खेळाडूचा नियम करण्यात यावा असा एक मतप्रवाह पुढे आला होता आणि त्याला भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पाठिंबा दिला होता. पंच आणि सामना निरीक्षक यांना जर खेळाडू गंभीररीत्या जखमी असल्याचे जाणवत असेल, तर त्याची शिक्षा संघाला कशाला. एका कमी खेळाडूसह कसे खेळायचे असे गंभीर यांनी म्हटले होते.

भारतीय देशांतर्गत क्रिकेट ठरणार प्रेरक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने अद्याप अशा प्रकारचा नियम करण्यासंदर्भात कसलाच विचार केलेला नाही. भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा नियम हा त्यांच्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर असू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये या नियमाचा कसा परिणाम होतो हे निश्चितपणे अभ्यासले जाईल.

बदली खेळाडूच्या नियमाच्या अटी

– खेळाडू बदली करताना ते समान असले पाहिजेत. म्हणजे फलंदाजाला फलंदाज, गोलंदाजाला गोलंदाज, अष्टपैलूला अष्टपैलू अशा पद्धतीने. बदली खेळाडूंसाठी नावे नाणेफेकीच्या दरम्यान सादर करणे आवश्यक.

– डॉक्टर आणि मैदानावरील पंचांशी सल्लामसलत केल्यानंतरच सामना निरीक्षक बदली खेळाडूबाबत अंतिम निर्णय घेतील. – जखमी खेळाडूस ताकीद मिळाली असेल किंवा कारवाईचा इशारा असेल, तर तो बदली खेळाडूस लागू असणार. – बदली खेळाडूंच्या यादीत राखीव यष्टिरक्षक उपलब्ध नसल्यास यादीबाहेरील खेळाडूला मान्यता.

– जखमी आणि बदली खेळाडू दोघांच्या नावावर सामना खेळल्याची नोंद केली जाईल.