BCCI Apex Council Meeting Guidelines: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांनी आयपीएल स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. हा विजय आरसीबीच्या खेळाडूंसह, चाहत्यांसाठी फार फारच आनंददायी क्षण होता. पण संघाच्या या आनंदाला गालबोट लागलं. आरसीबीचा संघ बंगळुरूमधील चाहत्यांबरोबर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचला. पण यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची मोठी घटना घडली. या चेंगराचेंगरीत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. यावर आता बीसीसीयआने मोठा निर्णय घेतला आहे.
बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कडक भूमिका घेतली आहे. भविष्यात असा कोणताही अपघात होऊ नये म्हणून बीसीसीआयने नवीन धोरण आखण्याची घोषणा केली आहे. यासाठी बोर्डाने एक नवीन समिती स्थापन केली आहे. जे या प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वे तयार करतील.
शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि ही जबाबदारी ३ सदस्यीय समितीकडे सोपवण्यात आली आहे. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय बेंगळुरू घटनेशी संबंधित होता, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. बैठकीनंतर, बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आणि त्यात, सर्वप्रथम, बंगळुरू चेंगराचेंगरी आणि अहमदाबाद विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.
बीसीसआयने भविष्यात बेंगळुरू अपघातासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन सदस्यांची समिती सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल, जी भविष्यात अशा कार्यक्रमांदरम्यान लागू केली जातील. या समितीचे अध्यक्षपद बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांच्याकडे असेल, तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार प्रभतेज सिंग हे देखील यात सहभागी असतील.
नव्या समितीचे हे तिन्ही अधिकारी बोर्डातील सर्वात महत्त्वाच्या पदांवर आहेत. तेच तिघे या समितीतील मोठे निर्णयही घेणार आहेत. या समितीला १५ दिवसांच्या आत आपला अहवाल आणि मार्गदर्शक तत्त्वे मंडळाला सादर करावी लागतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात ११ जणांचा मृत्यू झाला तर ५० लोक जखमी झाले. यानंतर, कर्नाटक सरकार, बंगळुरू पोलिस आणि आरसीबी व्यवस्थापन सर्वांच्या निशाण्यावर असताना, बीसीसीआयवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने या कार्यक्रमाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले, परंतु यामुळे बोर्डावर जोरदार टीका झाली.यानंतरच बीसीसीआयने विजयाच्या उत्सवांबाबत ठोस धोरण जाहीर केले.