जगभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आयपीएलसोबतच क्रिकेटची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी बीसीसीआयने प्रयत्न सुरु आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआय भारतीय संघातील सिनीअर खेळाडूंसाठी Isolation Camp आयोजित करण्याच्या विचारात आहे.

या कँपसाठी बीसीसीआय करोनाचा प्रभाव कमी असलेली जागा शोधत आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत खेळाडूंना राहण्यापासून ते सरावापर्यंतच्या सर्व सोयी आहेत. परंतू बंगळुरु शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालेली नसल्यामुळे हे शहर लॉकडाउन आहे. “खेळाडूंची सुरक्षा हा बीसीसीआयसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. प्रवास व इतर सर्व गोष्टींचा विचार केला असता बंगळुरुत सराव शक्य होईल का याचा विचार सुरु आहे. पण बंगळुरुत सराव करणं शक्य झालं नाही तर देशात इतर ठिकाणी करोनाचा प्रभाव कमी असलेल्या ठिकाणी सराव करता येईल का याची चाचपणी सुरु आहे. अशी जागा मिळाल्यास ते ठिकाण पूर्णपणे सॅनिटाईज केलं जाईल याची खबरदारी बीसीसीआय घेईल. याव्यतिरीक्त मोठी मैदानं खेळाडूंसाठी खुली करुन देण्याचाही एक पर्याय आहे.” बीसीसीआयच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली.

यासाठी बीसीसीआयचे अधिकारी खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापकांच्या संपर्कात असल्याचंही समजतंय. खेळाडूंच्या कँपसाठी जागा मिळाल्यास बीसीसीआयला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सरकारी परवानगी सोबत, खेळाडूंचा प्रवास, कँपच्या जागेवर वैद्यकीय टीम हजर असणं, कँप परिसरात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश न देणं या सर्व गोष्टींचा विचार बीसीसीआय करावा लागणार आहे. जून महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. मात्र जगभरातली सध्याची परिस्थिती पाहता हा दौरा होणं अशक्य दिसत आहे. त्यामुळे क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठीच्या प्रयत्नात बीसीसीआय यशस्वी ठरतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.