मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) घटनेत सुधारणा करा, अन्यथा २२ ऑक्टोबरला होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडणुकीतूून वगळण्यात येईल, असे निर्देश प्रशासकीय समितीने दिले आहेत.
देशातील जुनी क्रिकेट संघटना म्हणून लौकिक असलेल्या ‘एमसीए’ने ७०हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडवले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘एमसीए’ने लोढा समितीच्या सुधारणा शिफारशीनुसार नवी घटना नोंदणी करून घेतली. त्या वेळी संघटनेचा कारभार दोन निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेली प्रशासकीय समिती पाहात होती. परंतु ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीने या घटनेमधील चुका निदर्शनास आणल्या आहेत.
‘‘सर्वोच्च न्यायालयाने ९ ऑगस्ट २०१८ला दिलेल्या निकालानुसार शिफारशींमधील अपेक्षांची पूर्तता केल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेने नमूद केले आहे. परंतु त्यांच्या घटनेत काही त्रुटी आहेत. या सुधारणा न केल्यास ‘एमसीए’ला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही,’’ असे प्रशासकीय समितीने ई-मेलद्वारे कळवले आहे.
या घटनेचे करताना ‘बीसीसीआय’च्या कायदेविषयक चमूची मदत घेण्यात आली होती. याप्रमाणे यासंदर्भात सदस्यांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले होते. अद्याप तरी प्रशासकीय समितीच्या पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही, अशी माहिती ‘एमसीए’च्या वरिष्ठ सदस्याने दिली.
प्रशासकीय समितीने ‘एमसीए’ला १४ सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत. ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी योग्य निवडणूक अधिकारी द्यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
वानखेडेसंदर्भात क्रीडामंत्र्याची भेट
‘एमसीए’च्या शिष्टमंडळाने क्रीडामंत्री आशीष शेलार यांची भेट घेऊन वानखेडे स्टेडियम, क्रॉस मैदान, आझाद मैदान आणि ओव्हल मैदानाच्या कराराचे नूतनीकरण करण्याची विनंती केली.