Ben Duckett Shot: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारती संघाचा २२४ धावा करता आल्या आहेत. चौथ्या सामन्यात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. पण इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन डकेटने यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फटका मारून ऋषभ पंतची आठवण करून दिली आहे.

बेन डकेटचा अफलातून शॉट

भारतीय संघाचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आला. इंग्लंडकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी आक्रमक सुरूवात केली. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी संधीचं सोनं करून चौकार मारले. भारतीय संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी आकाशदीप गोलंदाजीला आला. या षटकात आकाशदीपने इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं होतं. यादरम्यान त्याचा एक चेंडू बेन डकेटच्या पॅडला जाऊन लागला होता. जोरदार अपील झाली, पण तो थोडक्यात बचावला. याच षटकात त्याने दमदार षटकार मारला.

आकाशदीपने षटकातील शेवटचा चेंडू डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या चेंडूवर बेन डकेटने फिरून किपरच्या वरून रिव्हर्स स्कूप शॉट मारला. हा फटका इतका अचूक होता की, बॅटला लागताच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. हा षटकार पाहून सर्वांना ऋषभ पंतच्या फलंदाजीची आठवण झाली असेल. कारण वेगवान गोलंदाजाविरूद्ध खेळताना रिव्हर्स स्कूप फटका मारणं सोपं नसतं. हे ऋषभ पंतने अनेकदा केलं आहे. पंतने जेम्स अँडरसनविरूद्ध खेळतानाही असाच फटका मारला होता.

इंग्लंडची दमदार सुरूवात

भारतीय संघाचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपल्यानंतर, इंग्लंडकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉलीची जोडी मैदानावर आली. या जोडीने बॅझबॉल स्टाईल सुरूवात केली. दोघांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९२ धावा जोडल्या. जॅक क्रॉलीने ५७ चेंडूंचा सामना करत ६४ धावांची खेळी केली. त्याला प्रसिद कृष्णाने बाद करत माघारी धाडलं. तर बेन डकेटने ३८ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. कर्णधार ओली पोप ४४ चेंडूंचा सामना करत २२ धावा करत माघारी परतला. इंग्लंडकडून जो रूट आणि हॅरी ब्रुक नाबाद आहेत.