Ben Stokes Gautam Gambhir on Injury Replacements: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी मँचेस्टर कसोटी वाचवली. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली होती. ऋषभ पंतच्या पायाची दुखापत इतकी गंभीर होती की त्याच्या पायाला फ्रॅक्चर करण्यात आलं. पण पंत पायाला फ्रॅक्चर असतानाही दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला. जगभरातील सर्वच क्रिकेटप्रेमींनी ऋषभ पंतच्या जिद्दीचं कौतुक केलं. पंतच्या या दुखापीतमुळे बदली खेळाडूबाबत मोठी चर्चा सुरू आहे. यावर आता गंभीरच्या वक्तव्यावर बेन स्टोक्सने टिप्पणी केल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सध्याच्या नियमांनुसार, दुखापत झाल्यास संघ बदली खेळाडूची निवड करू शकतात. परंतु पंतच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यासारखी इतर कोणतेही बाह्य दुखापती असल्यास, बदली खेळाडूला परवानगी दिली जात नाही. या नियमावरून सर्वच जण मत मांडत आहेत. खेळाडूला बाह्य दुखापत असल्यास संघाला बदली खेळाडू दिला पाहिजे, असं वक्तव्य कोच गौतम गंभीरने केलं. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या मते मोठी दुखापत झाल्यास सामन्याच्या मध्येच बदली खेळाडूला परवानगी द्यावी का यावरची चर्चा थांबवा त्याने म्हटलं आहे.
गौतम गंभीर बदली खेळाडू नियमाबाबत काय म्हणाला होता?
गौतम गंभीर चौथ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत म्हणाला, “जर पंच आणि सामनाधिकारी हे पाहत असतील आणि त्यांना एखाद्या खेळाडूला मोठी दुखापत झाल्यासारखी स्पष्टपणे जाणवत असेल, तर मला वाटतं की असा नियम असणे गरजेचं आहे जिथे तुम्हाला त्वरित बदली खेळाडू (substitute) मिळू शकेल. कारण अशा समोर दिसणाऱ्या दुखापतींमुळे संघ अडचणीत येतो.”
गंभीर पुढे म्हणाला, “यात काहीही चुकीचं नाही. विशेषतः अशा मालिका जिथे सर्व सामने अत्यंत अटीतटीचे झाले आहेत. समजा जर संघाला ११ खेळाडूंविरुद्ध फक्त १० खेळाडूंनी सामना खेळावा लागला, तर ती संघासाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट ठरेल. अशा वेळी योग्य तो बदली खेळाडू मिळणं गरजेचं आहे.”
बेन स्टोक्सची गंभीरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
“मला वाटतं की दुखापत झालेल्या खेळाडूंसाठी बदली खेळाडू मिळणं याबाबत चर्चा व्यवहार्यच नाही. माझ्या मते, जर तुम्ही दुखापतीसाठी बदली खेळाडू दिला, तर त्याचा गैरफायदा घेण्यासाठी खूप सारे मार्ग आणि त्रुटी उघड्या होतील. एखाद्या सामन्यासाठी एकदा ११ खेळाडू निवडले, तर मग दुखापती हा खेळाचा एक भाग आहे. मी कन्कशन रिप्लेसमेंटचा नियम समजू शकतो, ज्यात खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची असते. पण दुखापतीसाठी बदली खेळाडूच्या चर्चेला इथेच पूर्णविराम दिला पाहिजे”, असं स्टोक्स पुढे म्हणाला.
स्टोक्सने पुढे उदाहरण देत सांगितलं, “जर तुम्ही कोणालाही MRI स्कॅनसाठी पाठवलं, तर कोणत्याही गोलंदाजाच्या गुडघ्याभोवती थोडी सूज नक्कीच दिसेल. मग लगेच म्हणतील, ‘अरे चला आता याच्या जागी नवा गोलंदाज घेता येईल.’ मला वाटतं ही चर्चा इथेच थांबवायला हवी,” असं स्टोक्स स्पष्टपणे म्हणाला.