कोलकाता : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेण्याचा विचार केला असला, तरी आता गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळायचे की नाही हे ठरवू, असे इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितले. स्टोक्सला पुढील वर्षी २५ जानेवारीपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेसाठी तंदुरुस्त व्हायचे आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस त्याच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

भवितव्याविषयी बोलताना स्टोक्स म्हणाला, ‘‘माझ्याकडे सध्या कसोटी संघाची जबाबदारी आहे. कसोटी संघाबाबत मला खूप काही करायचे आहे. त्याचवेळी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड संघाला पुनरुज्जीवन देण्याविषयी देखील चर्चा सुरू आहे. अर्थात,  या गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी मला खूप विचार करावा लागेल.’’

हेही वाचा >>>IND vs NED: रोहित ब्रिगेडने भारताला दिली दिवाळी भेट, नेदरलँड्सवरील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी केले कौतुक

‘‘अलीकडच्या काळात क्रिकेट खूप खेळले जात आहे आणि याच एका कारणामुळे मी ताण कमी करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या एक दीड वर्षांचा विचार केला, तर आता कुठे मी यातून बाहेर पडताना दिसत आहे,’’ असेही स्टोक्सने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टोक्स सुरुवातीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे केवळ एक फलंदाज म्हणूनच खेळत होता. त्यानंतर कंबरेच्या दुखापतीमुळे त्याला विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळता आले नाही. यानंतरही इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूत स्टोक्स आघाडीवर राहिला आहे. सहा सामन्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांसह स्टोक्सने ३०४ धावा केल्या. या तीन मोठय़ा खेळी या अखेरच्या तीन सामन्यात झाल्या आहेत.