शेवटच्या सेकंदाला समरजितसिंग याची पकड करीत बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्स संघावर २८-२६ अशी मात करीत प्रो कबड्डी लीगमध्ये आव्हान राखले. अर्धा मिनिट बाकी असताना जयपूरकडे २६-२५ अशी आघाडी होती. नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पूर्वार्धात जयपूर संघाने १५-१२ अशी तीन गुणांची आघाडी घेतली होती. जयवीरसिंग याच्या खोलवर चढाया व उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवित जयपूर संघाने सामन्याच्या बहुतांश वेळ आघाडी राखली होती. ३९ व्या मिनिटापर्यंत त्यांनी दोन गुणांची आघाडी राखली होती. मात्र शेवटच्या चढाईत बंगालच्या दिनेशकुमार याने एक गडी बाद करीत ही आघाडी कमी केली. जयपूरचा समरजित हा त्याच्या संघाच्या शेवटच्या चढाईत वीस सेकंदाचा वेळ काढेल अशी अपेक्षा होती मात्र बंगालच्या खेळाडूंनी साखळी पद्धतीने त्याची पकड केली व जयपूर संघावर लोण चढविला. त्यामुळे त्यांना तीन गुण मिळाले. हीच पकड जयपूरच्या पराभवास कारणीभूत ठरली.
बंगाल संघाकडून नीलेश शिंदे याने पकडीत सात गुण मिळवित सर्वोत्तम बचावरक्षक तसेच सामन्याचा मानकरी पारितोषिक पटकाविले. त्याचे सहकारी जांग कुन ली व दिनेशकुमार यांनी चढाईत प्रत्येकी तीन गुणांची कमाई केली तर सचिन खांबे याने पकडीत तीन गुणांची कमाई केली. जयपूर संघाच्या जसवीरसिंग याने चढाईत नऊ व पकडीत एक असे एकूण दहा गुण मिळविले. राजेश नरवाल याने चढाई व पकडीत प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली.
अन्य लढतीत बंगळुरूने पाटण्यावर पाच गुणांनी विजय मिळवला. मनजीत चिल्लर याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगळुरू बुल्स संघाने पाटणा पायरेट्स संघाचा ३१-२६ असा पाच गुणांनी पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी १६-८ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. बंगळुरू संघाने पूर्वार्धात एक व उत्तरार्धात एक असे दोन लोण चढविले. शेवटची पाच मिनिटे बाकी असतानाही त्यांच्याकडे २६-१८ अशी आघाडी होती मात्र शेवटच्या पाच मिनिटांत पाटणा संघाच्या राकेशकुमार व संदीप नरेवाल यांनी केलेल्या आक्रमक खेळामुळे पाटणा संघास एक लोण नोंदविता आला. तीन मिनिटे बाकी असताना बंगळुरू संघाकडे केवळ चार गुणांची आघाडी होती मात्र ही आघाडी भरून काढण्यात पाटणा संघाला यश मिळाले नाही.