ब्लास्टर्सचा अहमदाबाद स्मॅश मास्टर्सवर विजय

प्रीमिअर  बॅडमिंटन लीग

उपांत्य फेरीत सर्वप्रथम धडक मारणाऱ्या अहमदाबाद स्मॅश मास्टर्सवर बेंगळूरु ब्लास्टर्सने ४-३ असा विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. चार सामन्यांनंतर दोन्ही संघांची ३-३ अशी बरोबरी झाली होती. त्यानंतरचा पाचवा सामना चांगलाच रंगतदार झाला, पण हा सामना बेंगळूरुने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत बेंगळूरु आणि हैदराबाद हंटर्स यांच्यामध्ये झुंज पाहायला मिळेल.

अहमदाबादच्या सौरभ वर्माने पुरुष एकेरीच्या लढतीत बेंगळूरुच्या चोंग वेई फेंगला १५-२, १४-१५, १५-१० असे पराभूत करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. पहिला गेम सौरभने अनपेक्षितपणे १३ गुणांच्या फरकाने जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये चोंगने तोडीस तोड खेळ केला. दोघांचेही १४-१४ असे समान गुण असताना चोंगने महत्त्वाचा गुण मिळवत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. पण तिसऱ्या गेममध्ये चोंगकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत सौरभने हा गेम पाच गुणांच्या फरकाने जिंकत सामना खिशात टाकला.

बेंगळूरुने हुकमाचा सामना म्हणून पुरुष दुहेरीची निवड केली होती. या लढतीत बेंगळूरुच्या बोए मथिआस आणि किम सा रँग यांनी आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. बोए आणि किम यांनी किदम्बी नंदगोपाल आणि ली चून हेई रेगीनाल्ड यांच्यावर १५-१३, १५-१२ असा विजय मिळवत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

अहमदाबादने हुकमाचा सामना म्हणून महिला एकेरीची निवड केली, कारण त्यांच्याकडून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली ताय झू यिंग कोर्टवर उतरणार होती. पण यिंगला बेंगळूरुच्या क्रिस्ती ग्लिमोरने कडवी झुंज दिली. पण या अटीतटीच्या लढतीत यिंगने ग्लिमोरवर ८-१५, १५-१३, १५-८ अशी मात केली. यिंगने पहिला गेम गमावला होता. पण दुसऱ्या गेममध्ये तिने झुंजार खेळ केला आणि हा गेम १५-१३ असा जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. हा गेम जिंकल्यावर यिंगचे मनोबल कमालीचे उंचावले आणि तिने लौकिकाला साजेसा खेळ करत ग्लिमोरवर १५-८ असा विजय मिळवत सामनाही आपल्या नावावर केला.

या गेमनंतर अहमदाबादने ३-२ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतरच्या लढतीत पुरुष एकेरीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर अ‍ॅक्सेल्सनने एच. एस. प्रणॉयला १५-११, १५-१४ असे पराभूत केले आणि त्यांनी ३-३ अशी बरोबरी साधली. अहमदाबाद आणि बेंगळूरु यांच्यातील निर्णायक सामना चांगलाच रंगला. या निकराच्या झुंजीत बेंगळूरुच्या किम सा रँग आणि सिक्की रेड्डी यांनी अहमदाबादच्या कमिला रायडर जूल आणि लॉ चेऊक हीम यांच्यावर १५-१२, १३-१५, १५-९ असा विजय मिळवला आणि संघाला अंतिम फेरीचे दरवाजे खुले केले.