पाण्याचा टँकर चालविणारा तरुण सध्या चर्चेचा विषय झाला आहे. बेंगलुरू येथील व्हाइटफिल्ड परिसरात राहणारा २५ वर्षीय के. जी. बालकृष्ण याने अलीकडेच बॉडीबिल्डिंगमधील ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब जिंकला. या विजयी कामगिरीनंतर बालकृष्ण ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर ऑफ व्हिइटफिल्ड’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. फिलिपाईन येथे पार पडलेल्या पाचव्या ‘फिल-एशिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप’मध्ये बालकृष्णने ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब आपल्या नावावर केला.

यशाचे हे शिखर गाठण्यासाठी बालकृष्णने एका दशकाहून अधिक काळ कठोर मेहनत केली. लहानपणीच वडिलांचा सहारा गमावलेल्या बालकृष्णच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आल्याचे इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’मधील वृत्तात म्हटले आहे. प्रसिध्द बॉडीबिल्डर आणि हॉलिवूड अभिनेता अर्नोल्डचा तो खूप मोठा चाहता आहे. या क्षेत्रातील कामगिरीबाबत आपण आनंदी असून, याच्याही पुढे जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. प्रत्येक क्षणी आपल्याला साथ दिलेल्या आई आणि भावाला आपण हा विजय समर्पित करत असल्याचे तो यावेळी म्हणाला.

सरकारकडून सहाय मिळत नसल्याची खंत
चॅम्पियनशिप जिंकल्यानंतरदेखील आर्थिक चणचण भासत असल्याचे बालकृष्णने सांगितले. सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने परदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेणे जिकरीचे होत असल्याचे तो म्हणाला. २०१३ मध्ये जर्मनीत भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ ज्युनियर’ स्पर्धादेखील त्याने जिंकली होती. तर २०१४ मध्ये ग्रीसमध्ये भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये देखील त्याने विजयी कामगिरी केली होती.

दररोज ६ तास व्यायाम
दररोज सहा तास व्यायाम करत असल्याचे बालकृष्णने सांगितले. यासाठी तो कोणत्याही जीममध्ये जात नसून, माजी मिस्टर युनिव्हर्स मुंबईचा संग्राम चौगुले आणि पंजाबचा मनीष कुमार बालकृष्णला त्याच्या घरीच ट्रेनिंग देतात.

असा आहे बालकृष्णचा आहार
सर्वसाधाराणपणे १२० किलोग्राम वजन कायम ठेवणारा बालकृष्ण स्पर्धेच्या काळात ३० किलो वजन कमी करतो. रोज ७५० ग्रॅम चिकन, २५ अंडी, ३०० ग्रॅम भात, २०० ग्रॅम भाज्या आणि अतिरिक्त प्रोटीनसाठी मासे व फळं खात असल्याचे त्याने सांगितले.