गोरेगाव येथील एमएचबी कॉलनीच्या संघर्ष मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे, भारत पेट्रोलियम, ठाणे पोलिस संघांनी आगेकूच केली. महिलांमध्ये पुण्याच्या सुवर्णयुगने पुढील फेरीत प्रवेश केला.
भारत पेट्रोलियमने मुंबई महानगर पालिका संघावर २०-९ अशी मात केली. पेट्रोलियमच्या शैलेश सावंत, निलेश सावंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत मध्यंतराला १९-८ अशी आघाडी घेतली. ही आघाडी सातत्याने वाढवत पेट्रोलियमने विजय मिळवला.
मध्य रेल्वेने बेस्ट संघाचा २८-८ असा धुव्वा उडवला. रेल्वेकडून अमीर धुमाळ, योगेश बोडके यांनी चतुरस्त्र खेळ केला. ठाणे पोलिसांनी बँक ऑफ इंडियाला २५-१४ असे नमवले. सुनील शिवतरकर आणि अजिंक्य यादव हे या विजयात चमकले. महिलांमध्ये सुवर्णयुगने उपनगरच्या पोयसर जिमखान्यावर ३६-२० असा विजय मिळवला. अनुभवी खेळाडू सोनाली इंगळेने अष्टपैलू खेळ करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवनेरी संघाने राणी लक्ष्मीबाई संघाचा २७-१४ असा पराभव केला. वैशाली महाडिक, भारती मोहिते या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat petroleum central railway mayor cup kabaddi
First published on: 08-03-2014 at 06:01 IST