करोडो क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असलेला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा अशी मागणी करण्यात आली आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनतर्फे विराट कोहलीचा ‘भारतरत्न’ने गौरविण्याची मागणी केली आहे.
सचिननंतर भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनतर्फे (एआयजीएफ) केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एआयजीएफने लिहिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखीच कोहलीची कामगिरी विराट असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच, कोहलीचा बॅटिंग अॅव्हरेज जगात उत्तम असल्याचेही फेडरेशनने पत्रात नमूद केले आहे. ही मागणी मान्य झाल्यास ‘भारतरत्न’ने सन्मानित केला जाणारा विराट हा दुसरा क्रीडापटू ठरेल.