Angelo Matthews Announced Retirement: भारतीय संघातील दिग्गज खेळाडू रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. रोहितनंतर विराट कोहलीनेही पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. या दोन्ही खेळाडूंनंतर आता आणखी एक दिग्गज खेळाडूने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा

अँजेलो मॅथ्यूजने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या मित्रांनो, मी कृतज्ञ मनाने असंख्य आठवणींसह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. १७ वर्ष श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी सर्वौच्च सन्मान आणि अभिमानाचे क्षण होते. ज्यावेळी आपण संघाची जर्सी परिधान करतो, त्यावेळी देशभक्ती आणि सेवाभाव याहून मोठं आणखी काहीच नसतं. मी क्रिकेटला सर्वकाही दिलं, मोबदल्यात क्रिकेटनेही मला खूप काही दिलं. मी जे काही आहे, ते क्रिकेटमुळेच आहे.”

अँजेलो मॅथ्यूजची कसोटी कारकिर्द

अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याने २००९ मध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यातून आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली होती. अँजेलो मॅथ्यूज हा श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेसाठी कुमार संगकाराने १२४०० धावा केल्या आहेत. तर महेला जयवर्धने ११८१४ धावा केल्या आहेत. अँजेलो मॅथ्यूजने ११८ कसोटी सामन्यांमध्ये ८१६७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १६ शतकं आणि ४५ अर्धशतकं झळकावली आहेत. ज्यात नाबाद २०० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

गॉलमध्ये खेळणार शेवटचा कसोटी सामना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या एक वर्षांपासून अँजेलो मॅथ्यूज मर्यादीत षटकांचं क्रिकेट खेळताना दिसून आलेला नाही. मात्र, गॉलचा मैदानावर होणारा कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ११९ वा सामना असणार आहे. २००९ मध्ये त्याने श्रीलंकेच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. बांगलादेशविरूद्धचा सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. ३७ वर्षीय अँजेलो मॅथ्यूज लवकरच आपला ३८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी तो कसोटी क्रिकेटला रामराम करणार आहे.