Cheteshwar Pujara Retirement: भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली नाही. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेटला अलविदा केलं आहे.

टी-२० क्रिकेटच्या युगात फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचं काम चेतेश्वर पुजाराने केलं.पुजाराला २००८ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी राहुल द्रविड देखील कसोटी संघाचा भाग होता. राहुल द्रविडला भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखलं जायचं. पण राहुल द्रविडनंतर चेतेश्वर पुजाराने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. गेल्या दशकाभरात तो भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील मजबूत भिंत म्हणून उभा राहिला. मायदेशात आणि परदेशातही त्याने टिच्चून फलंदाजी करत गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा

पुजाराने भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. पुजाराने आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, “भारतीय संघाची जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत म्हणणं आणि दरवेळी मैदानात उतरून संपूर्ण ताकदीने खेळणं, या भावना शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. तसंच मी आता भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.”

पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी अनेकदा दमदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये चेंडू अंगावर मारून घेतले होते, पण विकेट फेकून तो माघारी परतला नव्हता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर कब्जा केला होता. या विजयात पुजाराने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. त्या ला २०२३ मध्ये भारतीय कसोटी संघासाठी शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. त्याला भारतीय कसोटी संघाासाठी १०३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ७१९५ धावा केल्या . ज्यात १९ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.