बिहारचा २२ वर्षीय फलंदाज साकिबुल गनीच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीला धमाकेदार सुरुवात झाली आहे. गनीने प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक ठोकले आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह तो रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कोलकाता येथे खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात साकिबुल गनीने मिझोरामविरुद्ध त्रिशतक पूर्ण केले, त्याने ३८७ चेंडूत ५० चौकार ठोकले.

याआधी हा विक्रम मध्य प्रदेशचा फलंदाज अजय रोहराच्या नावावर होता. २०१८-१९च्या रणजी मोसमात त्याने हैदराबादविरुद्ध ही कामगिरी केली. त्याने २६७ धावांची खेळी केली होती. मात्र, बिहारच्या साकिबुलने सरळ त्रिशतक झळकावले आहे.

हेही वाचा – वर्ल्डकप जिंकणाऱ्या ‘मराठी’ खेळाडूनं केली फसवणूक? BCCIकडं दाखल झाली ‘गंभीर’ तक्रार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिझोराम विरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि ७१ धावांतच ३ विकेट पडल्या. साकिबुल गनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. या फलंदाजाने बाबुल कुमारच्या साथीने मिझोरामच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ५०० हून अधिक धावांची भागीदारी झाली. वैयक्तिक ३४१ धावांवर साकिबुल माघारी परतला. त्याने ४०५ चेंडूंचा सामना करत ५६ चौकार आणि २ षटकार ठोकले.