scorecardresearch

वर्ल्डकप जिंकणाऱ्या ‘मराठी’ खेळाडूनं केली फसवणूक? BCCIकडं दाखल झाली ‘गंभीर’ तक्रार!

नुकत्याच झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये ‘त्याला’ CSKनं संघात दाखल करून घेतलं.

u19 world cup winning player rajvardhan hangargekar accused of age fudging
अंडर १९ वर्ल्डकप विजेता भारतीय संघ

टीम इंडियाला नुकताच अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा मराठी खेळाडू वयचोरी प्रकरणात अडकला आहे. वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याच्यावर वय कमी केल्याचा गंभीर आरोप झाल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंगरगेकरचे खरे वय २१ वर्षे आहे आणि तरीही तो अंडर-१९ वर्ल्डकप खेळला. या स्पर्धेत त्याने त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती.

टीम इंडियाने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून वर्ल्डकप जिंकला. हंगरगेकरवर वय लपवल्याचा गंभीर आरोप क्रीडा व युवक विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे. या आयएएस अधिकाऱ्याने बीसीसीआयला पत्र लिहिले असून त्यात त्यांनी हंगरगेकर याच्याविरोधात पुरावेही पाठवले आहेत.

सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगरगेकरच्या जन्मतारखेची पुष्टी केली आहे. त्यानुसार राज्यवर्धन हा धाराशिव येथील तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या नोंदीनुसार, इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची हंगरगेकरची जन्मतारीख १० जानेवारी २००१ होती. मात्र, आठवीच्या वर्गात नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी अनौपचारिकपणे राज्यवर्धनची जन्मतारीख बदलून १० नोव्हेंबर २००२ केली. म्हणजेच १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी राज्यवर्धन हंगरगेकरचे वय २१ वर्षे होते.

राजवर्धन हंगरगेकर

हेही वाचा – IPL 2022 : विराट कोहलीच्या RCBला मिळाला नवा कप्तान; मॅक्सवेल नव्हे, तर….!

बीसीसीआयच्या तपासात हंगरगेकर दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. २०१७-१८मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सलामीवीर मनजोत कालराही वयाच्या वादात अडकला होता आणि त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. असे झाले तर हा हंगरगेकरसाठी मोठा धक्का असेल. एवढेच नाही, तर या खेळाडूचा आयपीएल करारही रद्द होऊ शकतो.

आयपीएल २०२२च्या लिलावातही हंगरगेकरला मोठी रक्कम मिळाली आहे. हंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्जने दीड कोटी रुपयांना संघात दाखल केले. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही बोली लावली पण शेवटी चेन्नईने बाजी मारली. मात्र, आता या वादानंतर हंगरगेकरचे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: U19 world cup winning player rajvardhan hangargekar accused of age fudging adn