महाघोटाळ्यातील सहभागाप्रकरणी फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांना आचारसंहिता समितीने ९० दिवसांसाठी निलंबित केले. या बंदीच्या शिक्षेमुळे ब्लाटर यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अशा कोणत्याही फुटबॉल संघटनेचे काम करता येणार नाही. ब्लाटर यांनी या निलंबनाविरोधात दाद मागण्याचे ठरवले आहे. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी स्वत:च्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्याची संधी न दिल्याचा आरोप ब्लाटर यांनी केला. मात्र आचारसंहिता समितीने ब्लाटर यांचा आरोप फेटाळला आहे. ब्लाटर यांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले. दरम्यान ब्लाटर यांच्यातर्फे अधिकृत अपील करण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आचारसंहिता समितीसमोर अतिरिक्त सुनावणी व्हावी, अशी मागणीही ब्लाटर यांच्यातर्फे करण्यात आली आहे. ब्लाटर यांच्यानंतर अध्यक्षपदाचे दावेदार असणारे निलंबित प्लॅटिनी यांनीही निलंबनाविरोधात दाद मागण्याचे निश्चित केले आहे. ‘‘२० ऑक्टोबर रोजी झुरिच येथे फिफाच्या कार्यकारिणी समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याचे फिफाने स्पष्ट केले. २६ फेब्रुवारीला संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. अध्यक्षपदाचा फैसला या बैठकीतच होणार आहे. ही निवडणूक पुढे ढकलावी यासाठी या बैठकीत विचार होऊ शकतो,’’ असे फिफामधील सूत्रांनी सांगितले. अध्यक्ष ब्लाटर, यूईएफएचे अध्यक्ष मिचेल प्लॅटिनी आणि सरचिटणीस जेरोम व्हाल्के यांना निलंबित केल्यानंतर संघटनेची आपत्कालीन बैठक आयोजित व्हावी या मागणीने जोर धरला होता. त्या पाश्र्वभूमीवर ही बैठक होणार आहे.