इंग्लंडचा धडाकेबाज आणि बंडखोर फलंदाज केव्हिन पीटरसन याने भारतीय दौऱ्यावर मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही प्रभावी कामगिरी केल्याने त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने पूर्णपणे कराबद्ध करावे, असे मत इंग्लंडचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनी व्यक्त केले आहे.
बेशिस्त वर्तनामुळे पीटरसनला इंग्लंडच्या संघातून वगळण्यात आले होते. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातही त्याला स्थान देण्यात आले नव्हते. पण भारतीय दौऱ्यासाठी त्याची निवड केली आणि कसोटी मालिकेत त्याने दमदार कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली. त्यामुळेच पीटरसनला फक्त क्रिकेटच्या एका प्रकारासाठी करारबद्ध न करता पूर्णपणे करारबद्ध करावे, असे फ्लॉवरला वाटते.
पीटरसनने मुंबई कसोटीत वातावरण आणि खेळपट्टी फलंदाजीला फारशी अनुकूल नसताना आक्रमक खेळी साकारली. त्याच्या या खेळीने मालिकेला एक चांगले वळण मिळाले. त्याचबरोबर त्याने महत्वपूर्ण दोन अर्धशतकी खेळीही साकारल्या. फलंदाजीबरोबरच त्याचे क्षेत्ररक्षण चांगले होते, त्याचबरोबर त्याचे ‘ड्रेसिंग रूम’मधले वागणे उत्तम होते, त्यामुळे त्याला काही ठराविक क्रिकेटसाठी मर्यादीत न ठेवता पूर्णपणे करारबद्ध करावे, असे फ्लॉवर म्हणाले.