साल २००२.. विश्वचषकाची अंतिम फेरी.. ब्राझील आणि जर्मनी या दोन महासत्तांमध्ये तुंबळ युद्ध रंगले.. पण रोनाल्डोच्या दोन गोलच्या बळावर ब्राझीलने विश्वचषकावर आपले नाव कोरले.. त्यानंतर ब्राझीलने विश्वचषक जिंकलेला नाही तर जर्मनीनेही अंतिम फेरी गाठलेली नाही.. पण आता हे दोन संघ पुन्हा एकदा यंदाच्या विश्वचषकात उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.. ‘आपण विश्वचषक जिंकणार’, हे स्वप्न ज्याने तब्बल १२ वर्षांनी ब्राझीलवासीयांना दाखवले तोच नेयमार दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.. कर्णधार थिआगो सिल्वासुद्धा या सामन्यात खेळू शकणार नाही.. संघाचा कणा मोडल्यामुळे ब्राझीलवर आभाळ कोसळले आहे.. पण तरीही समस्त ब्राझीलकरांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन हा संघ लढण्यासाठी सज्ज झाला आहे.. दुष्काळात तेरावा महिना आणि त्यातच जर्मनीचे कडवे आव्हान समोर आहे.. अशामध्ये ब्राझीलचा संघ आणि २००२ साली संघाला विश्वविजय मिळवून देणारे प्रशिक्षक लुईस फेलिपे स्कोलारी कोणती रणनीती आखतात याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. दुसरीकडे जर्मनीचा संघ पूर्णपणे तंदुरुस्त आणि चांगल्या फॉर्मात आहे. कागदावरही ब्राझीलपेक्षा जर्मनीचा संघ बलाढय़ दिसत असून जर्मनी विश्वचषकात एक नवीन इतिहास लिहिणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे ब्राझील अडथळ्यांची शर्यत पार करीत इतिहासाची पुनरावत्ती करण्यात यशस्वी ठरणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
ब्राझीलच्या संघाने कोलंबियाविरुद्धचा सामना जिंकला असला तरी त्यांना नेयमार आणि सिल्वा यांच्या रूपात दोन जबर धक्के बसले आहेत. त्यामुळे ब्राझीलच्या संघात नक्कीच अस्वस्थता असेल. पण स्कोलारी या वेळी संघाला या सामन्यात कसे उभे करतात, यावर त्यांचा जय-पराजय अवलंबून असेल. नेयमार आणि सिल्वा नसल्याने ब्राझीलला आक्रमणाबरोबरच बचावावर अधिक भर द्यावा लागेल. आक्रमणासाठी त्यांच्याकडे ऑस्कर, हल्क, फ्रेड हे त्रिकूट आहे. डेव्हिड लुइसचीही त्यांना यासाठी मदत होऊ शकते. पण त्यांना बचावावर अधिक भर द्यावा लागेल. नेयमार आणि सिल्वा यांच्या जागी संघात डांटे आणि विलियन बोग्र्स डा सिल्वा यांचा समावेश करण्यात येऊ शकतो.
जर्मनीचा संघ हा यंदाचा विश्वचषकातला सर्वोत्तम संघ समजला जात आहे. कारण प्रत्येक फळीमध्ये त्यांच्याकडे अव्वल खेळाडू आहे. आक्रमण करण्यासाठी त्यांच्याकडे थॉमस म्युलर, मेसुत ओझील आहेत, त्याचबरोबर गोलचा विश्वविक्रम करण्यासाठी मिरास्लोव्ह क्लोसही आतुर असेल. मधल्या फळीत टोनी क्रुस, बॅस्टियन श्वेनस्टाइगर असतील, तर कर्णधार फिलीप लॅमवर बचावाची धुरा असेल. आतापर्यंत जर्मनीने स्पर्धेमध्ये सरस खेळ केला असून एकही सामना गमावलेला नाही. सावध आणि संयत खेळ करीत त्यांनी प्रतिस्पध्र्याच्या तोंडचे पाणी पळवले आहे. जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लो यांना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे कोडे अजूनही सुटलेले नाही, ते या वेळी सुटेल का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
दोन्ही संघांवर नजर टाकली तर ब्राझीलपेक्षा जर्मनीचे पारडेच जड दिसत आहेत. अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीने ब्राझीलचा संघ बलाढय़ दिसत नाही. दुसरीकडे जर्मनीच्या संघात दुखापतग्रस्त खेळाडू नाही. हा सामना मैदानाबरोबरच दोन्ही प्रशिक्षकांच्या रणनीतीमध्येही असेल. ज्यांचा रणनीतीचा अवलंब होईल, त्यांना अंतिम फेरीत जाण्याची नामी संधी असेल. पण या सामन्यात नेत्रदीपक खेळाची मेजवानी प्रेक्षकांसाठी नक्कीच असेल.
आमने-सामने
सामने : १
ब्राझील : विजय : १
सामना क्र. ६१
ब्राझील वि. जर्मनी
* स्थळ : इस्टाडिओ मिनेइराओ, बेलो होरिझोंटे
* वेळ : मध्यरात्री १.३० वा. पासून
गोलपोस्ट
नेयमार आणि थिआगो सिल्वा हे दोन्ही नावाजलेले खेळाडू उपांत्य फेरीत संघात नसल्याने आमच्यावर दडपण नक्कीच आहे. पण दडपणाखाली चांगली कामगिरी होत असते. जर्मनीच्या संघाने दमदार कामगिरी केली असली तरी विश्वचषक जिंकण्यासाठी आम्हाला त्यांचे आव्हान परतवावे लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
– हल्क, ब्राझील
ब्राझीलकडे पूर्वीसारखे फुटबॉलचे जादूगार आता नाहीत. त्यांच्या संघामध्ये बराच बदल झाला आहे. त्यांच्या खेळाच्या पद्धतीमध्येही बदल झाला आहे. पण ब्राझीलकडून उपांत्य फेरीत आम्हाला नक्कीच कडवी झुंज मिळेल. आम्ही या आव्हानासाठी सज्ज आहोत. या सामन्यात ब्राझीलबरोबर आम्हाला पंचांपासूनही सावध राहावे लागेल.
बॅस्टियन श्वेनस्टाइगर, जर्मनी