आयपीएलचा अकरावा हंगाम ऐन रंगात आलेला असताना, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाबद्दल महत्वाची भविष्यवाणी केली आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटचं प्राबल्य पाहता, आगामी काळात कसोटी क्रिकेटचं भवितव्य खडतर असेल असं मत मॅक्युलमने व्यक्त केलं आहे. ESPN Cricinfo या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मॅक्युलमने आपलं मत मांडलं आहे. कसोटी क्रिकेटला मैदानात प्रेक्षकांची होणारी तुरळक गर्दी आणि टी-२० क्रिकेटकडे तरुणाईचा असलेला कल पाहता, आगमी वर्षांमध्ये संघही टी-२० क्रिकेट खेळण्यास प्राधान्य देतील असं मॅक्युलम म्हणाला.

“सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमी संघ कसोटी क्रिकेट खेळणं पसंत करतात. प्रेक्षकांच्या दृष्टीने विचार करायला गेल्यास, ते देखील टी-२० क्रिकेट पाहणं अधिक पसंत करतात. कसोटी क्रिकेटसाठी ४ ते ५ दिवस टीव्हीसमोर बसून राहणं आताच्या जगात कोणालाही शक्य नाहीये. कसोटी क्रिकेटचं एखादं सत्र, किंवा शेवटच्या दिवसाचा काहीसा खेळ लोकं पाहू शकतात. मात्र सामना संपेपर्यंत कसोटी क्रिकेट पाहण्यासाठी टिव्ही सेटला चिकटून राहणं कोणालाही शक्य नाही. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेट आगामी काळात कसं टिकेल हा मोठा प्रश्नच आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मॅक्युलमने निवृत्ती स्विकारली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा मॅक्युलम दुसरा खेळाडू ठरला आहे. मात्र निवृत्तीनंतर मॅक्युलम सर्व देशांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सहभाग घेतो आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी लागणारी शैली, टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे नसली तरीही चालते. त्यामुळे आगामी वर्षांमध्ये टी-२० क्रिकेटने एक वेगळी उंची गाठली असेल असंही मत मॅक्युममने व्यक्त केलंय.