Cameron Green Record: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत मालिका खिशात घातली आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने वादळी शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह त्याने ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅमेरून ग्रीनने अवघ्या ४७ चेंडूत वादळी शतकी खेळी केली. यासह तो वनडे क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी दुसरा सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल या यादीत अव्वल स्थानी आहे. मॅक्सवेलने २०२३ मध्ये नेदरलँडविरुद्ध फलंदाजी करताना अवघ्या ४० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज कोण?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिविलियर्स अव्वल स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात डिविलियर्सने अवघ्या ३१ चेंडूत वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं. हा विक्रम त्याने २०१५ मध्ये केला होता. आता २०२५ मध्ये म्हणजेच १० वर्षानंतरही या विक्रमाच्या जवळपासही कोणाला पोहोचता आलेलं नाही.

कॅमेरून ग्रीनची दमदार फलंदाजी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांअखेर ४३१ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या ट्रॅव्हिस हेडने दमदार कामगिरी करत १०३ चेंडूत १४२ धावांची खेळी केली.

त्यानंतर शेवटी ग्रीनने ११८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. कर्णधार मिचेल मार्शने १०० धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरीने नाबाद ५० धावांची खेळी केली. यासह ऑस्ट्रेलियाच्या टॉप ३ फलंदाजांनी शतकं झळकावली. तर एका फलंदाजाने अर्धशतक झळकावलं.