जावई गुरुनाथ मयप्पन जर आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला, तर क्रिकेट प्रशासक एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदापासून दूर का ठेवू नये, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग संदर्भातील अहवाल मुद्गल समितीने सादर केल्यानंतर सोमवारी या अहवालावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा सवाल विचारला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवापर्यंत तहकूब केली आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २० नोव्हेंबरला होणार असून तोपर्यंत जर श्रीनिवासन यांच्याबाबतचा निर्णय झाला नाही, तर त्यांना अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे सध्या तरी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी अध्यक्षपदावर असले तरी त्यांच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबतचे भवितव्य अधांतरीच असल्याचे म्हटले जात आहे.
मुद्गल समितीने अहवाल सादर केल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी, जर एन. श्रीनिवासन यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली, पण जर त्यांचा कुणी नातेवाईक या प्रकरणात दोषी आढळला, तर श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून दूर का ठेवू नये, असा सवाल उपस्थित केला आहे.
या प्रश्नावर उत्तर देताना एन. श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, जर श्रीनिवासन या प्रकरणात दोषी नसतील, तर त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ द्यावे आणि जर त्यांचे ते नातेवाईक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
याचिका दाखल करणाऱ्या बिहार क्रिकेट असोसिएशनचे वकील हरिष साळवे यांनी या वेळी आपली बाजू मांडताना सांगितले की, जर मयप्पन या प्रकरणी दोषी आढळले, तर श्रीनिवासन यांना या वेळी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहू देऊ नये.
हरिष साळवे यांनी मुद्गल समितीचा अहवाल लोकांपुढेही सादर व्हायला हवा, अशी विनंती न्यायालयाला केली, पण सिब्बल यांनी या गोष्टीला विरोध केला.
मुद्गल समितीच्या अहवालामध्ये कोणत्याही खेळाडूचे थेट नाव देण्यात आलेले नाही; पण त्या खेळाडूंबाबतचे संकेत क्रमांक मात्र देण्यात आले आहेत. या संकेतस्थळांचा वेगळा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये श्रीनिवासन यांच्यासह काही महत्त्वपूर्ण खेळाडूंची नावे असल्याचे म्हटले जात असले तरी आतापर्यंत या खेळाडूंची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.