नोव्हाक जोकोव्हिच व जान्को टिप्सेरेव्हिक यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच सर्बियाने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. त्यांनी उपांत्य फेरीत १-२ अशा पिछाडीवरून कॅनडावर ३-२ अशी मात केली.
या स्पर्धेत २०१०मध्ये अजिंक्यपद मिळविणाऱ्या सर्बियाला अंतिम लढतीत चेक प्रजासत्ताकच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही लढत १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. चेक प्रजासत्ताकने प्राग येथील लढतीत अर्जेटिनाविरुद्ध ३-० अशी विजयी आघाडी घेतली.
बेलग्रेड येथील लढतीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या जोकोव्हिच याने मिलोस राओनिक याच्यावर ७-६ (७-१), ६-२, ६-२ अशी सरळ तीन सेट्समध्ये मात केली. पाठोपाठ टिप्सेरेव्हिक याने व्हॅसेक पोप्सील याचा ७-६ (७-३), ६-२, ७-६ (८-६) असा पराभव केला आणि संघास ३-२ असा विजय मिळवून दिला.