यंदाच्या वर्षातला झंझावाती फॉर्म कायम राखत कार्लोस अल्काराझने युएस ओपन टेनिस स्पर्धेत यानिक सिनरला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. चुरशीच्या अंतिम लढतीत अल्काराझने सिनरवर ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा विजय मिळवला. अल्काराझचं युएस ओपन स्पर्धेचं दुसरं तर एकूण सहावं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. जेतेपदासह २२वर्षीय अल्काराझने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. अल्काराझच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती.
ट्रम्प यांच्या उपस्थितीमुळे सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. सुरक्षायंत्रणा सज्ज होईपर्यंत सामना सुरू होण्याची वेळ अर्ध्या तासाने पुढे ढकलण्यात आली. महत्त्वपूर्ण अशा अंतिम लढतीसाठी ट्रम्प यांचं आगमन होताच जल्लोष आणि हुर्यो दोन्ही गोष्टींनी स्वागत झालं. मैदानातल्या जायंट स्क्रीनवर ट्रम्प दिसल्यानंतर त्यांची हुर्यो उडवण्याचं प्रमाण वाढलं. ट्रम्प यांच्या येण्यामुळे सुरक्षाव्यवस्थेत बदल करण्यात आले. ग्रँड स्लॅम फायनल मुकाबला हाऊसफुल्ल असतो पण सुरक्षेच्या कारणास्तव मैदान हाऊसफुल्ल होऊ शकलं नाही. ट्रम्प यांच्यासह ब्रूस स्प्रिंगस्टीन, टॉमी हिलफिगर, मायकेल डग्लस, स्टेफ करी उपस्थित होते.
ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये हार्डकोर्टवर सिनर २७ सामने जिंकला होता. सिनरचा दबदबा मोडून काढत अल्काराझने वर्चस्व सिद्ध केलं. मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला मात्र ते पुरेसं नव्हतं असं सिनरने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. अल्काराझविरुद्ध सिनरचा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेला दुसरा पराभव आहे. जून महिन्यात फ्रेंच ओपन स्पर्धेतही सिनरला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
युएस ओपन स्पर्धेत गतविजेत्यांना जेतेपद राखता न येण्याची परंपरा यंदाही सुरूच राहिली. रॉजर फेडररने २००४ ते २००८ मध्ये युएस ओपन स्पर्धेचं जेतेपद राखण्याची किमया केली होती मात्र त्यानंतर कुठल्याही विजेत्याला जेतेपद राखता आलेलं नाही.