Carlos Alcaraz vs Novak Djokovic: यूएस ओपन २०२५ स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ या दोन्ही खेळाडूंमध्ये पार पडला. दोन्ही खेळाडूंमध्ये अडीच तास अटीतटीची लढत रंगली. या लढतीत अल्काराझ पुन्हा एकदा जोकोविचवर भारी पडला आहे. या शानदार विजयासह अल्काराझने २०२२ नंतर दुसऱ्यांदा यूएस ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या सामन्यात अल्काराझने जोकोविचवर ६-४,७-६(४), ६-२ ने विजय मिळवला.

या स्पर्धेतील फायनलमध्ये अल्काराझचा सामना वर्ल्ड नंबर १ जेनिक सिनरसोबत किंवा ऑगर अलियासिमेसोबत होऊ शकतो. हा विजय अल्काराझसाठी खास ठरू शकतो. जर त्याने फायनलचा सामना जिंकला, तर हे त्याचं यूएस ओपन स्पर्धेतील दुसरं जेतेपद असेल. यासह त्याच्याकडे सिनरला मागे सोडून वर्ल्ड नंबर १ बनण्याची संधी देखील असणार आहे. त्यामुळे यावेळी अल्काराझ पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो.

अल्काराझचा जोकोविचवर दमदार विजय

या सामन्यात अल्काराझला जोकोविचवर विजय मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली नाही. त्याने या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयानंतर अल्काराझ म्हणाला, “आज मी चांगली सर्व्हिस केली, जे खूप महत्वाचं होतं. मला वाटतं मी चांगला खेळ केला. मी दुसऱ्यांदा यूएस ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे, याचा मला आनंद आहे.”

या सामन्यात अल्काराझने दमदार सुरूवात केली. त्याने पहिल्याच गेममध्ये जोकोविचव १-० ने आघाडी घेतली. ३०-४० स्कोअर असताना जोकोविचन एक ब्रेक पाँईट वाचवला. पण दुसऱ्यांदा तो अल्काराझला थांबवण्यात अपयशी ठरला.अल्काराझने दमदार खेळ करत अवघ्या ४८ मिनिटात पहिला सेट आपल्या नावावर केला.

अल्काराझकडून हल्ले सुरू होते, पण जोकोविच देखील आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्याला जोरदार प्रत्युत्तर देत होता. जोकोविचने अल्काराझची सर्व्हिस ब्रेक करत ३-० ने आघाडी घेतली. पण जोकोविचला आघाडी फार काळ टिकवून ठेवता आली नाही. अल्काराझने दुसऱ्या ब्रेकमध्ये दमदार पुनरागमन केलं आणि गुण ३-३ ने बरोबरीत आणले. ६-४,७-६(४), ६-२ ने बरोबरीत आणले. आता अल्काराझचा फायनलचा सामना कोणासोबत होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.