चेक बाऊन्स प्रकरणी, डीएस एंटरप्रायझेसचे मालक नीरज कुमार निराला यांनी बेगुसराय येथे न्यू ग्लोबल उपज बर्धक इंडिया लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यासह कंपनीच्या सात लोकांविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. धोनीशिवाय कंपनीचे मार्केट स्टेट हेड अजय कुमार, व्यवस्थापकीय संचालक राजेश शर्मा, डायरेक्टर अकाउंट एडमिनिस्ट्रेशन महेंद्र सिंह, मार्केटिंग हेड अर्पित दुबे, एडी इम्रान बिन जफर, मार्केटिंग मॅनेजर बंदना आनंद यांच्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरज निराला यांनी २०२१ मध्ये ३६ लाख ८६ हजार रुपये देऊन या कंपनीचे मार्केटिंग खतांचा सीएनफ घेतल्याचा आरोप केला आहे. उत्पादनाचे मार्केटिंग योग्य नसल्याने त्यांनी कंपनीने पाठवलेले खत परत केले, त्याबदल्यात कंपनीने तीस लाख रुपयांचा धनादेश दिला. हा चेक बँकेत क्लिअरन्ससाठी दिला होता जो बाऊन्स झाला.

चेक बाऊन्स झाल्यानंतर निराला यांनी कायदेशीर नोटीसही पाठवली होती पण कंपनीकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. यानंतर निराला यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी रुम्पा कुमारी यांच्यासमोर तक्रार पत्र दाखल करून कंपनीची जाहिरात करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसह सर्वांना आरोपी केले. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० आणि १३८ एनआय कायद्याचे हे प्रकरण न्यायदंडाधिकारी अजय मिश्रा यांच्याकडे तपास आणि निकालासाठी वर्ग केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या उत्पादनाची जाहिरात केली होती. त्यामुळे नीरज कुमार निराला यांनी धोनीविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. नीरज कुमार निराला यांच्या वकिलाने सांगितले की, पुढील सुनावणीसाठी २८ जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आता या प्रकरणात महेंद्रसिंह धोनीवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.