महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने १५व्या छत्रपती शिवाजी चषक (पुरुष, महिला) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ५ ते ९ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही स्पर्धा रंगणार असून, यंदा या स्पध्रेचे स्वरूप बदलून अखिल भारतीय स्तराऐवजी राज्यस्तरावर खेळविण्यात येणार आहे.
राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पध्रेत बाद फेरीकरिता पात्र ठरलेले १२ संघ, तर विदर्भ जिल्हा कबड्डी असो.च्या निवड चाचणीत  उपांत्य फेरीत पात्र ठरलेले ४ संघ असे १६ जिल्ह्यांचे पुरुष आणि महिला संघ या स्पध्रेत सहभागी होणार आहेत. साखळी सामन्यात विजय मिळविणाऱ्या संघात पाच हजार तर पराभूत संघास अडीच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याचाच अर्थ साखळीमध्ये सर्व लढती (तिन्ही) गमावणारा संघही साडेसात हजार रुपयांची कमाई करणार आहे. अशा प्रकारे या स्पध्रेवर बक्षिसांची खरात करण्यात आली आहे.