पीटीआय, नवी दिल्ली
राष्ट्रकुल २०३० स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताकडून बोली लावण्याच्या निर्णयाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्याचबरोबर जागतिक दर्जाच्या स्टेडियमसह अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा असलेल्या अहमदाबाद शहरालाच आदर्श स्थान म्हणूनदेखील पसंती देण्यात आली.
भारताने या वर्षी मार्चमध्ये स्पर्धेसाठी बोली लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) देखील केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर काही दिवसांतच केंद्रीय मंत्रिमंडळाने क्रीडा मंत्रालयाच्या या प्रस्तावावर मोहोर उमटवली.
स्पर्धेच्या यजमानपदासाठी बोली सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून, आता पुढील दोन दिवसांत बोली सादर करण्याची औपचारिकता ‘आयओए’कडून पूर्ण करण्यात येईल. भारताने यापूर्वी २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले आहे.
संबंधित मंत्रालय, विभाग आणि अधिकाऱ्यांकडून आवश्यक हमी आणि बोली स्वीकारल्यास गुजरात सरकारला आवश्यक अनुदान मंजूर करून यजमानपदासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यासदेखील मान्यता देण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या महासभेत ग्लासगो येथे यजमान देशाचा निर्णय घेण्यात येईल. यजमानपदाच्या शर्यतीत असलेल्या कॅनडाने आर्थिक अडचणीमुळे माघार घेतली असल्यामुळे भारताला हा मान मिळण्याची शक्यता वाढली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनामुळे ७२ देशांचे खेळाडू येथे येतील आणि त्यामुळे पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे. स्थानिक व्यावसायिकांना फायदा होऊन चांगला महसूल उपलब्ध होणार आहे. तसेच क्रीडा विज्ञान, विविध कार्यक्रमांचे आयोजन, व्यवस्थापन, आयटी आणि संप्रेषण, जनसंपर्क, प्रसारण आणि माध्यम अशा विविध क्षेत्रांत व्यावसायिकांना संधी निर्माण होतील, असे सरकारला वाटत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सर्व खेळांचा समावेश
पुढील वर्षी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खर्चावर नियोजन करण्यासाठी खेळांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी यांसारख्या काही प्रमुख खेळांना वगळून केवळ दहा खेळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मात्र, भारतात जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली जाईल, तेव्हा ‘आयओए’ने वगळलेल्या सर्व खेळांचा समावेश केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. अलीकडच्या काळात भारताचे वर्चस्व असलेल्या तिरंदाजी, कबड्डी, खो-खो या खेळांच्या समावेशासाठीदेखील आम्ही आग्रही राहू अशी ‘आयओए’ची योजना आहे.
अहमदाबादच का?
अहमदाबाद शहरात जागतिक दर्जाची स्टेडियम, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असून, येथील उत्साही क्रीडा संस्कृती असल्यामुळे यजमानपदासाठी या शहराची निवड करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमने २०२३ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत यशस्वीपणे आयोजित करून आपली क्षमता दाखवून दिली असल्याचे मानले जाते. त्याच वेळी २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन येथेच करण्याचे ध्येय सरकार बाळगून आहे. याच महत्त्वाकांक्षेने येथील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जात आहे.