*उस्मान ख्वाजाचे सलग तिसऱ्या कसोटीत शतक

*जो बर्न्‍सचेही दमदार शतक

*ऑस्ट्रेलियाची ३ बाद ३४५ अशी दमदार मजल

उस्मान ख्वाजा आणि जो बर्न्‍स यांच्या दिमाखदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद ३४५ अशी दमदार मजल मारली आहे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी दिवसभर झगडावे लागले.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाला फलंदाजी देण्याचा निर्णय विंडीजचा कर्णधार जेसॉन होल्डरने घेतला. दुखापतीतून सावरणाऱ्या ख्वाजाने (१४४) मागील चार कसोटी डावांतील आपले तिसरे शतक झळकावले आहे. तसेच सलामीवीर बर्न्‍सने चालू हंगामातील दुसरे शतक साकारले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील (एमसीजी) गेल्या १६ वर्षांतील सर्वात कमी ५३,३८९ प्रेक्षकसंख्येची नोंद शनिवारी झाली.

पाकिस्तानमध्ये जन्मलेला ख्वाजा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मागील दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. मात्र गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत त्याने सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना १७४ आणि १२१ धावा केल्या होत्या. शनिवारी ख्वाजाने बर्न्‍ससोबत दुसऱ्या विकेटसाठी २५८ धावांची भागीदारी रचली. या मैदानावरील दुसऱ्या विकेटसाठी ही तिसऱ्या क्रमांकाची विक्रमी भागीदारी ठरली. ख्वाजाला १४२ धावांवर जीवदान मिळाले होते. ख्वाजाने २२७ चेंडू आणि ३३१ मिनिटे किल्ला लढवून सहा चौकार आणि एका षटकारासह आपली खेळी उभारली.

शॉन मार्शने होबार्टच्या कसोटीत १८२ धावांची खेळी साकारूनही निवड समितीने त्याला विश्रांती देण्याचा गंभीर निर्णय घेतला होता. मार्शऐवजी संघात परतलेल्या ख्वाजाने आपली भूमिका चोख पार पाडली. त्याला साथ देणाऱ्या बर्न्‍सने २३० चेंडूंचा सामना करीत १६ चौकार आणि एका षटकारासह १२८ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद ३४५ (जो बर्न्‍स १२८, उस्मान ख्वाजा १४४; जेरॉम टेलर २/८३)