दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. या सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या व सलमान खानच्या मैत्रीबद्दल खुलासा केला. बॉलीवूडमधील एकमेव मित्र सलमान खान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत भन्साळी सलमानबद्दल काय म्हणाले, ते जाणून घेऊयात.

सलमान खानबद्दल काय म्हणाले भन्साळी?

भन्साळी म्हणाले, “एकमेव व्यक्तीबरोबर माझी अजूनही मैत्री आहे आणि तो म्हणजे सलमान खान होय. ‘इन्शाअल्लाह’ चित्रपट होऊ शकला नसला तरी तो अजूनही माझ्या पाठीशी उभा आहे. तो मला फोन करतो, माझी काळजी घेतो. ‘तू ठीक आहेस ना? तुला काही हवंय का? तू ना गोंधळला आहेस,’ असं तो म्हणतो. मला त्याचे विनोद खूप आवडतात. त्याचा फोन तीन महिन्यांतून एकदा येतो किंवा पाच महिन्यांतून एकदा येतो, पण तो येतो कारण त्याला माझ्या चित्रपटाची पर्वा नाही. त्याला माझी काळजी आहे. ‘तू माझ्याबरोबर इतके चित्रपट केलेस, त्याचा मला काही फरक पडत नाही. पण तू ठीक आहेस ना?’ असं तो विचारतो आणि तेच महत्त्वाचं आहे.”

ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

‘आम्ही कदाचित भांडले असू, पण…’

भन्साळी पुढे म्हणाले, “एकत्र काम करताना कदाचित आम्ही भांडलो असू, कदाचित ती वेळ बरोबर नसेल आणि भांडणं झाली असतील. पण एक महिन्यानंतर, त्याने मला फोन केला आणि मी त्याला फोन केला आणि आम्ही एकमेकांशी बोललो हीच तर मैत्री असते. त्यामुळे मी नशीबवान आहे की सहा महिन्यांतून एकदा बोलणारा आणि आपण मागच्यावेळी बोलणं जिथे संपलं तिथून सुरुवात करणारा एक मित्र माझ्याजवळ आहे.”

Video: नुपूर शिखरेचं आईसह ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील; पत्नी आयरा खानची खास कमेंट, तर सुश्मिता सेनला हसू आवरेना

सलमान व भन्साळी यांनी एकत्र ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमा केला होता. त्यानंतर भन्साळी ‘इन्शाअल्लाह’ नावाचा एक चित्रपट तयार करणार होते. यात सलमान खान आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार होते. पण काही कारणांनी २०१९ मध्ये हा चित्रपट रखडला आणि अजून तो बनू शकलेला नाही. सध्या संजय लीला भन्साळी त्यांच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली, ज्यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.